
अर्जुनी-मोरगाव : गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून रेंगाळत असलेल्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणावर तयार करण्यात येत असलेली झासीनगर उपसा सिंचन योजना त्वरित मार्गी लावण्यात यावी. संबंधित योजनेची इत्यंभूत माहिती जिल्हा परिषद सभागृहाला मिळण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे यांनी केली असून सदर मुद्दा सभागृहात उपस्थित केल्यामुळे शितल पुंड, सदस्य सचिव जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी 18 ऑगस्ट 2022 च्या पत्रानव्हे विषयांकित माहिती मिळण्यासंबंधाने वरिष्ठ अधिकारी वर्गाची समिती गठीत केली असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे यांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी झासीनगर उपसा सिंचन योजना टप्पा एक व टप्पा दोन सुरू करण्यासंदर्भात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला या योजनेसाठी 40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र दिवसेंदिवस कामाची व्याप्ती वाढत गेल्यानेही या योजनेवर आतापर्यंत 140 करोड रुपये खर्च करण्यात आले. झासीनगर उपसा सिंचन योजना पहिला टप्पा हा नवेगावबांध जलाशयात पाणी पाडण्याचा होता. मात्र गेल्या वीस वर्षापासून ही उपसा सिंचन योजना दुर्लक्षित आहे. सध्या नवेगावबांध जलाशयातून तालुक्यातील 22 गावांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. या सिंचन योजनेतूनच पाणीपुरवठा करणे हा टप्पा एकचा भाग होता. मात्र ही योजनाच सुरू न झाल्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात आम्ही पाणीपुरवठा करणार नाही. असे ठरविण्यात आल्याने ही योजना कुचकामी ठरत आहे.
आतापर्यंत झासीनगर उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी अनेक उपाययोजना केली गेली. सर्व प्रकारच्या मशीन-या सुद्धा लावण्यात आल्या. मात्र ही योजना पूर्ण न झाल्याने सर्व मशीनला जंग चढून खराब अवस्थेत आले आहेत. या संदर्भात जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा 30 जून 2022 तसेच 26 जुलै 2022 मध्ये या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे यांनी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झासीनगर उपसा सिंचन योजना मध्यम प्रकल्प विभाग गोंदिया यांचे दुर्लक्षपणामुळे प्रलंबित अवस्थेत असून सदर योजनेचे काम कंत्राटदार सोडून गेलेले आहेत. तसेच सबंधित विभागाचे अधिकारी सभागृहात उपस्थित राहत नसल्याने आवश्यक ती माहिती जिल्हा परिषद सभागृह गोंदियाला मिळत नाही. तेव्हा झासीनगर उपसा सिंचन योजनेबाबतची माहिती सभागृहाला मिळावी. तसेच सदर प्रकल्प कशामुळे रखडलेला आहे? त्यात काय अडचणी आहेत? याची माहिती सभागृहाला मिळण्यासाठी समिती तयार करण्याबाबत सभेत चर्चा झाली.
त्या अनुषंगाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांनी या योजनेची विषयांकित माहिती मिळण्यासंबंधाने अधिकारी वर्गाची समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून जिल्हा जलसंधारण अधिकारी लघुपाटबंधारे विभाग जिल्हा परिषद गोंदिया सत्यजित राऊत तर सदस्य म्हणून सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी गोवर्धन बिसेन, उपविभागीय जलसंधारण अधिकारी विकास देशपांडे, जलसंधारण अधिकारी चंद्रमुनी पटले ही चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने संबंधित विभागाशी संपर्क करून प्रत्यक्ष कार्यस्थळाची पाहणी करून झासीनगर उपसा सिंचन योजनेबाबत माहिती मिळवून तसा अहवाल पंधरा दिवसाचे आत सादर करावा. असे आदेशही सदस्य सचिव जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांनी दिले आहेत.