वर्गणीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणाऱ्या आमदार होळींचे बॅनर जाळले

0
56

गडचिरोली -विधानसभेतील भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गणपती वर्गणीसाठी आलेले चामोर्शी येथील नगरसेवक आशीष पिपरे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार होळी यांचे बॅनर जाळल्याने भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.चामोर्शी तालुका हा गडचिरोली विधानसभा मतदार संघात मोडतो. त्यामुळे येथील भाजपचे नगरसेवक पिपरे व कार्यकर्ते दरवर्षीप्रमाणे आ. डॉ. होळी यांच्याकडे गणपतीच्या वर्गणीकरिता गेले असता होळींनी त्यांना शिवीगाळ केली.एवढ्यावरच न थांबता ‘तुम्ही दारू बंदीची मागणी का करता’, असा प्रश्नदेखील केला. आपल्याच पक्षातील आमदाराने अपमान केल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचे बॅनर जाळून निषेध नोंदविला. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीदेखील केली. तेली समजाकडूनही पत्रक काढून आ. होळी यांचा निषेध करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आ. होळी यांचे माध्यम समन्वयक रमेश अधिकारी यांनी देखील त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते.

दरवर्षीप्रमाणे मंडळाचे कार्यकर्ते आ. होळी यांच्याकडे वर्गणी मागायला गेले असता त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली. तुम्ही दारूबंदीची मागणी का करता, असेही ते म्हणाले. ज्या तेली समाज व भाजप कार्यकर्त्यांच्या बळावर ते निवडून आलेत, आज ते त्यांनाच शिवीगाळ करीत आहेत. याचा आम्ही निषेध करतो.– आशीष पिपरे, नगरसेवक, चामोर्शी.