दहा दिवसानंतरही मध्यान भोजनावर बहिष्कार सुरूच

0
38
चौकशी करतांना, सभापती रहांगडाले,गटविकास अधिकारी चौरागडे, तथा गटशिक्षणाधिकारी राऊत
वाढदिवसाच्या शुभेच्छा

सावरी येथील निकृष्ट आहार पुरवठा प्रकरण

कारवाईची नागरिकांची मागणी

गोंदिया(ता.30)- तालुक्यातील सावरी येथील जि. प.च्या शाळेत निकृष्ट व सडलेले धान्य पोषण आहार म्हणून पुरवठा करण्यात आले होते. या पोषण आहारावर आक्षेप घेत शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी मध्यान भोजनावर बहिष्कार घातला. या बहिष्कारला दहा दिवस उलटत चालले तरी अजूनही शिक्षण विभागाने नवीन पोषण आहार पुरवठा न केल्याने अद्यापही पोषण आहारावर बहिष्कार सुरूच आहे. परिणामी शालेय विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत उपाशी पोटीच राहावे लागत आहे.
येथील जिल्हा परिषदेच्या मुले/ मुलींच्या शाळेत जवळपास चारशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन म्हणून निकृष्ट व कीड लागलेल्या धान्याचा पुरवठा कंत्राट दाराकडून करण्यात आला होता. सदर कीड लागलेले धान्य येथील गुरुजींनी शाळेतील विद्यार्थ्यांना सलग तीन दिवस खाऊ घातले हे विशेष.सदर बाब लक्षात येताच येथील शाळा व्यवस्थापन समितीन व पालकांनी बुधवार (ता.21) पासून मध्यान भोजनावर बहिष्कार टाकला व शाळेच्या आवारातच पत्रकार परिषदेत कीड लागलेले धान्य दाखवून शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून पं.समितीचे सभापती मुनेश रहांगडाले, गटविकास अधिकारी डॉ.चौरागडे,गटशिक्षणाधिकारी राऊत यांनी तातडीने शाळेला भेट देत लवकरच नवीन आहार पुरवठा करण्यात येईल तसेच दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या या आश्वासनाला दहा दिवसाचा काळ उलटत चालला तरी ना ही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली ना ही शाळेत नवीन आहार पुरवठा करण्यात आला. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत उपाशीपोटीच राहावे लागत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आस्वासनाची पूर्तता केली नसल्यामुळे येथील पालक वर्गांमध्ये रोष दिसून येत आहे. कदाचित सदर प्रकरण शिक्षण विभाग दडपण्याचा तर प्रयत्न करत नाही ना? असा आरोपही पालकांनी लावला आहे.

प्रतिक्रिया- सदर धान्य व वस्तू चौकशीअंती निकृष्ट व कीडयुक्त आढळून आले. संबंधित कंत्राटदाराला तात्काळ बदलविण्याचे सांगण्यात आले परंतु अद्यापही त्यांनी बदलले नाही.
श्री राऊत गटशिक्षणाधिकारी प. स. गोंदिया

प्रतिक्रिया- शाळेत अजूनही चांगले आहार पोहोचले नसल्याने सध्या तरी पोषण आहार बंदच ठेवण्यात आला आहे. श्री सोनवणे मुख्याध्यापक जि. प. शाळा (मुली) सावरी