प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत तलाठ्याने केला घोळ;सेजगाव ग्राम पंचायतीतील प्रकार

0
40

सरपंचासह गावकर्‍यांचा विरोध
गोंदिया : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील तलाठ्याने चक्क प्रारूप मतदार यादीमध्येच घोळ केल्याचे समोर आले आहे. परिणामी यावर आक्षेप घेण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच कंठीलाल पारधी यांनी दिली असून गैरप्रकार करणार्‍या तलाठ्यावर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील निवडणूक होणार्‍या ग्राम पंचायतीच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द झाल्या असून त्यावर १८ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे.
विधानसभा मतदारसंघाच्या ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यावर १८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या २१ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जातील. प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. कारण विधानसभेच्या संबंधित तारखेला अस्तित्वात असलेल्या याद्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आहे तशा वापरल्या जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणार्‍या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागनिहाय यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात. मात्र सेजगाव येथील तलाठ्याने प्रारूप मतदार याद्या तयार करताना एका प्रभागातील सुमारे १०० जवळपास मतदारांना दुसर्‍या प्रभागात तर दुसर्‍या प्रभागातील अनेक मतदारांना तिसर्‍या प्रभागात दाखल केले. परिणामी तलाठ्याने प्रभाग रचनेची वाट लावली. हा प्रकार प्रारूप यादी प्रसिध्द झाल्यानंतर उघडकीस आल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाला घेवून सरपंच के.के.पारधी, उपसरपंच स्वप्नील महाजन, माजी पं.स.उपसभापती डॉ.किशोर पारधी, गौरीशंकर पारधी यासह अनेकांनी यादीवर आक्षेप घेत आक्षेप नोंदविणार असल्याचे सांगितले. तसेच गैर प्रकार करणार्‍या तलाठ्यावर प्रशासनाने कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे.