गोंदिया जिल्ह्यात 348 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा वाजला बिगुल

0
29

गोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील 348 ग्रामपंचायतींवर जनतेतून थेट सरपंचाची निवड केली जाणार आहे. 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे गुलाबी थंडीत जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार आहे. सरपंच उमेदवारांसह सदस्य पदांसाठी उमेदवारांची निवड पूर्ण करून प्रचार मोहिमेसाठी रणनीती आखली जात आहे.

ग्रामपंचायतमध्ये प्रशासक राज येणार व त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लांबणीवर जाणार, या आशेने अनेक गावात उमेदवारांची निवड करण्यास पुढार्‍यांनी दुर्लक्ष केले होते. मात्र आता सर्वांनी उमेदवारांच्या निवडीवर फोकस केले आहे. उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज असलेले निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवार लोकांच्या व पुढार्‍यांच्या भेटी घेत आहेत. त्यातच पुढार्‍यांनी सदस्य पदांसाठी उमेदवारांची यादी बनविणे सुरू केले असून येत्या चार-पाच दिवसांत त्याला अंतिम रूप देवून प्रचार सुरू करण्यात येणार आहे.

निवणुकीत तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या

गोंदिया जिल्ह्यातील 348 ग्रामपंचायतींपैकी गोंदिया तालुक्यातील 71, तिरोडा तालुक्यातील 74, आमगाव तालुक्यातील 34, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील 40, देवरी तालुक्यातील 25, गोरेगाव तालुक्यातील 30, सडक-अर्जुनी तालुक्यातील 43, सालेकसा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले असून, पुढील महिनाभर ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघणार आहे.

28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज…

निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 18 नोव्हेंबर रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटिस प्रसिद्ध करतील. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन मागविण्यात येईल. 5 डिसेंबर रोजी अर्जाची छानणी होईल. 7 डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची वेळ व निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येईल. 18 डिसेंबर रोजी मतदान व 20 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.

348 ग्रामपंचायतींवर होणार थेट सरपंचाची निवड

शासनाने सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात होणार्‍या 348 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 348 सरपंचांची थेट जनतेतून निवड केली जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये चुरस वाढली आहे.

राजकीय पक्ष लागले कामाला

स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक हाच प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून सज्ज व सतर्क झाले असून सभा व बैठकीचे नियोजन केले आहे.

भूमिपूजन व राजकीय कार्यक्रमांना ब्रेक

– निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या तारखेपासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या सभा,  बैठका, भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमांना ब्रेक लागला आहे.

मंडई उत्सवातून संपर्क

– जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवाळीनंतर मंडई उत्सवाला सुरुवात होते. सध्या मंडई उत्सव जोरात सुरू असून याच दरम्यान ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने मंडई उत्सवाच्या माध्यमातून भावी उमेदवार जनसंपर्क वाढवित असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

भाऊ रामरामला झाली सुरुवात

– ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. भावी उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भावी उमेदवारांनी भाऊ रामराम म्हणण्यास सुरुवात झाली आहे. कधी रामराम न घेणारे आता आर्वजून रामराम घेत आहेत.

भावी उमेदवार ॲक्टिव्ह मोडवर

– ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भावी उमेदवारांनी सर्वप्रथम मतदार याद्या गोळा करून आपल्या वॉर्डात किती मतदार आहेत. यापैकी किती जणांचे मतदान आपल्याला मिळू शकते याचा अंदाज घेत सरपंच की सदस्य  पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा याची तयारी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. गुरुवारी तहसील कार्यालयात  ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांच्या याद्या घेण्यासाठी भावी उमेदवारांची गर्दी दिसून आली.