
गोंदिया-जिल्ह्यातील विविध समस्यांच्या अनुषंगाने आढावा घेण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे महत्त्वाची बैठक खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून घेण्यात आली.
गोंदिया येथे सुरू असलेल्या रेल ओवर रेल बांधकामाच्या अनुषंगाने चर्चा करताना विविध विषयांवर यावेळी मंथन झाले. या बांधकामासाठी अतिक्रमित घरांचे अतिक्रमण काढून त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश यावेळी खासदारांनी दिले. यासाठी नगर परिषद, बांधकाम विभाग आणि अन्य यंत्रणांनी योग्य ती कारवाई करावी असेही सांगण्यात आले. गोंदिया शहरात बांधण्यात येत असलेल्या विविध रोड ओवर ब्रिजदरम्यान येत असलेल्या अडचणी या बैठकीत चर्चेत आल्या. अडचणी दूर करून ही कामे लवकरात लवकर पूर्ण होतील, यादृष्टिने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. रेल्वेची जी जागा सरकार किंवा नझूलच्या नावाने आहे. ती रेल्वेला परत मिळावी, यादृष्टिने कारवाई करावी व त्या ठिकाणी वाहनतळ तयार होईल, यासाठी प्रयत्न करावेत असेही या बैठकीत खासदारांनी सांगितले. या बैठकीत अन्य इतरही विषयांवर चर्चा करून आवश्यक तिथे ताबडतोब कारवाई करण्याच्या सूचना खासदारांनी केल्या.
बैठकीला गोंदियाचे आ. विनोद अग्रवाल, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, रेल्वेचे विभागीय आयुक्त जगताप, सिंग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी बोरकर, सा. बां. विभाग गोंदियाचे कार्यकारी अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते.