Home विदर्भ १ कोटी रुपयांचा निधी मंजूर;भाजी बाजार यार्डाचे काम पूर्णत्वास येणार

१ कोटी रुपयांचा निधी मंजूर;भाजी बाजार यार्डाचे काम पूर्णत्वास येणार

0

गोंदिया-येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीबाजार यार्डाचे बांधकाम निधीअभावी रखडून होते. नुकतेच शासनाने भाजी बाजाराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गोंदिया येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे.
येथे जिल्ह्यासह शेजारील राज्यातून मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक होते. मात्र अनेकदा जागेअभावी शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमाल विक्री करता येत नव्हता. ही अडचण पाहून तत्कालीन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी स्वतंत्र भाजी बाजार यार्ड बांधकाम करण्याची संकल्पना मांडली. तसा आराखडाही शासनाकडे पाठविण्यात आला. शासनाने यास मंजुरी देऊन ४ कोटी रुपयांचा निधी जारी केला. यार्डाचे बांधकामही सुरू झाले. जवळपास ९0 टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु निधी कमी पडल्याने उर्वरित बांधकाम रखडून होते. त्यामुळे येथे शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांसह व्यापारी, अडते यांना अडचणीला सामोरे जावे लागत होते. रखडलेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तो उपलब्ध करून दिल्याने कृषी उत्पन बाजार समितीच्या यार्डात भाजीबाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Exit mobile version