Home विदर्भ डीइआयसी मध्ये 152 दिव्यांग बालकांची तपासणी

डीइआयसी मध्ये 152 दिव्यांग बालकांची तपासणी

0

 गोंदिया, दि.14  :   बाई गंगाबाई महिला रुग्णालयात असलेल्या शीघ्र हस्तक्षेप केंद्राच्या वतीने दिनांक 9 मार्च  ते 11 मार्च दरम्यान जिल्हा परिषद समग्र शिक्षा अभियानच्या सहकार्याने  दिव्यांग शालेय विद्यार्थ्यांसाठी लोकली मेड  साहित्य मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

        या शिबिराचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे यांच्या हस्ते व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. महेंद्र गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी शिबिराचे संयोजक विजय ढोकने,  बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर,  डीइआईसीचे बालरोग तज्ञ डॉ. प्रदीप गुज्जर, व्यवस्थापक  पारस लोणारे, समुपदेशक अजित सिंग, फिजिओथेरपिस्ट कांचन भोयर व प्रगती मनोहर प्रामुख्याने उपस्थित होत्या.

        विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील सर्वदूर तालुक्यातील शाळेतून विशेष गरजा असलेल्या बालकांना शिक्षक स्वतः पालकांना सोबत घेऊन साधन सामग्री मोजमापसाठी घेऊन आले होते.

        पालकांनी आपल्या पाल्याचे अपंगत्व लपवू नये, तात्काळ तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व मोफत उपचार करून घ्यावा. बाई गंगाबाई महिला रुग्णालय शिबिरामध्ये खास दिव्यांग बालकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार केंद्र सुरू करण्यात आलेले आहे त्याचा लाभ घ्यावा, असे डॉ.अंबरीश मोहबे यांनी आवाहन केले.

        सध्या 9 फेब्रुवारी पासून ‘जागृत पालक सुदृढ बालक’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत तालुका स्तरावरील शिबिरांमधून संदर्भ सेवा दिलेले गंभीर आजारी बालके व दिव्यांग बालके यांना गोंदिया येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात येत आहे. अशा सर्व विशेष गरजा असलेल्या बालकांचा डीइआईसी मध्ये मोफत उपचार केला जात आहे,असे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले.

        यावेळी दंत चिकित्सक डॉ. शेवाळे यांनी शिबिरामधील सर्व बालकांची मोफत दंत तपासणी करून पालकांना समुपदेशन केले. अमित शेंडे यांनी दिव्यांग बालकांची मौखिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी या बाबत माहिती दिली.

        भौतिक उपचार तज्ञ कांचन भोयर व श्रीमती प्रगती मनोहर यांनी 152  दिव्यांग बालकांचे मोजमाप नागपूर येथून आलेल्या टीम सोबत उपस्थित राहून घेतले व त्यांना लोकली मेड साधनाच्या साह्याने जीवन सुखकर कसे होईल याबाबत प्रयत्न केले.

         शिबिराच्या यशस्वीतेसाठी डीइआईसी च्या पॅरामेडीकल स्टाफ व  आरबीइसचे टीम आणि प्रयोगशाळा अधिकारी त्रिभुवन लिल्हारे व मनोविकार समुपदेशक रिटा नेवारे, शालिनी यादव यांनी सहकार्य केले.

Exit mobile version