यवतमाळात तिघांचा तलावात बुडून मृत्यू

0
13

यवतमाळ : येथून जवळच असलेल्या कीटकापरा येथे सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोघेजण तलावात बुडाले. ऋषभ नितीन बजाज (२०, रा. बाजोरिया नगर, यवतमाळ) व सुजय विनायक कावळे (१७, रा. ब्राह्मणवाडा, ता. आर्णी) अशी बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. ऋषभचा मृतदेह सापडला असून, सुजयचा शोध सुरू आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. दुसरीकडे, यवतमाळ तालुक्यातील टाकळी येथील तलावात शुक्रवारी बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह शनिवारी सापडला.

यवतमाळच्या शासकीय तंत्रनिकेतनमधील १० ते १२ विद्यार्थी लगतच्या कीटकापरा येथे सहलीसाठी गेले. येथील तलावात पोहण्यासाठी तिघेजण   पाण्यात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. सोबतच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र केवळ एकालाच ते वाचवू शकले. ऋषभ व सुजय पाण्यात बुडाले. अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.

विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

टाकळीतील विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला यवतमाळ तालुक्यातील टाकळी येथील तलावात शुक्रवारी बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह अखेर आज, शनिवारी सापडला. करण विशाल गाडेकर (१३) असे मृताचे नाव आहे. करण जिल्हा परिषदेच्या शाळेत सातव्या वर्गात शिकत होता. शुक्रवारी तो चार, पाच मित्रांसह टाकळी येथे तलावावर फिरण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या करणचा बुडून मृत्यू झाला. कालपासून त्याचा शोध सुरू होता. आज शनिवारी त्याचा मृतदेह शोधपथकाला सापडला.