एका कंत्राटी आरोग्य सेविकेवर ५ महसुली गावांच्या हजारो नागरिकांच्या आरोग्याची धुरा

0
22

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उपकेंद्र राजोली येथील प्रकार 
अर्जुनी मोर. :-ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सुरळीत आणि सुव्यवस्थित व्हावी याकरिता शासन कागदावर पैशाची उधळपट्टी करीत आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळा अभावी नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहण्याची वेळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या राजोली आरोग्य उपकेंद्रातील हजारो नागरिकांवर येत आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली उपकेंद्रात केवळ एकमेव कंत्राटी आरोग्य सेविका कार्यरत असून जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अती दुर्लक्षितपणामुळे आरोग्य सेवेची पूर्ती वाट लागली आहे. आरोग्य उपकेंद्र परिसरातील पाच महसुली गावांसह अंतर्गत येणाऱ्या वाड्या अशा हजारों नागरीकांच्या आरोग्याचा भार एका कंत्राटी आरोग्य सेविकावर असल्यामुळे विशेषतः गरोदर मातेसह किरकोळ उपचार घेणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत असल्याचे विदारक सत्य दिसून येत आहे.
राजोली येथे आरोग्य उपकेंद्राची प्रशस्त इमारत असून एक स्थायी आरोग्य सेविका व आरोग्य सेवक आणि कंत्राटी आरोग्य सेविका अशी पद निर्मिती आहे मात्र येथील स्थायी आरोग्य सेविकेचे स्थानांतरण करण्यात आले.त्या बदल्यात कुण्याही स्थायी आरोग्य सेवेकेची व्यवस्था करण्यात आली नाही.तर आरोग्य सेवक प्रशिक्षणास गेल्याने गेल्या अनेक दिवसांपासून सगळा भार एकट्या कंत्राटी आरोग्य सेविकेवर आला आहे.
परिणामी आरोग्य सेविकेवर भरणोली खडकी शिवरामटोला बलीटोला तिरखुरी आणि नांगनडोह येथील आरोग्य सेवेचा भर पडत आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच कोंडी होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत यात अधिकाधिक प्रमाणात लसीकरण सर्वे आणि गावागावात घरोघरी फिरून दौरे करणे आवश्यक असते अशावेळी एकट्या कंत्राटी आरोग्य सेविकेला उपकेंद्रात आलेल्या रुग्णांना सेवा आणि इतर कामांना न्याय देताना कसरत करावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित करून तातडीने रिक्त जागा भरून आरोग्य सेवा सुरळीत करावी अन्यथा नाममात्र उपकेंद्र ठेवण्यापेक्षा बंदच करा अशी संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.