साक्षरता कार्यक्रम सर्वेक्षणावर बहिष्कार- संजय उके

0
6
**कास्ट्राईब शिक्षक संघटना : शिक्षण आयुक्तांना पाठविले पत्र
  गोंदिया- नवभारत साक्षरता कार्यक्रम – सर्वेक्षण अंतर्गत १५ वर्षापेक्षा जास्त  निरक्षर स्त्री व पुरुष यांच्या सर्वेक्षणामुळे , अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर  विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कास्ट्राईब शिक्षक संघटना म. रा. शाखा जिल्हा गोंदियाने या सर्वेक्षणावर  बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे पत्र  शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना पाठविण्यात आले अशी माहिती  कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे  जिल्हाध्यक्ष संजय उके यांनी दिली आहे.
         शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामामुळे शिक्षकांना अध्यापन कार्यासाठी वेळ मिळत नाही. जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता आहे. सात वर्ग आणि दोन शिक्षक व काही शाळांमध्ये एकच शिक्षक चार वर्गांना अध्यापन कार्य करीत आहेत. त्यातच निरक्षर सर्वेक्षण करून त्यांना साक्षर करण्याची जबाबदारी पुन्हा शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. निरक्षर लोकांना साक्षर करण्याच्या प्रयत्नात  ६ ते १४ वयोगटाची मुले निरक्षर होण्याची भीती आहे.
        नवनवीन उपक्रमाची पत्र, सारखे अहवाल मागविणे, लिंक भरणे, अशैक्षणिक कामे, सर्वेक्षण, विविध अप डाऊनलोड करून माहिती देणे,  व्हॉटसअप वरून महत्त्वाचे, अती महत्वाचे म्हणून माहिती मागितली जाते. काही शाळांमध्ये इंटरनेट उपलब्ध नाही, त्यामुळे शिक्षकांनी शिकवायचे कधी असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. वास्तविक शिक्षणाव्यतिरिक्त जनगणना, निवडणूक  वगळून कोणतेही अशैक्षणिक कामे देऊ नयेत अशी आरटीई – २००९ मध्ये तरतूद आहे. विविध प्रकारच्या अशैक्षणिक कामात शिक्षकांना गुंतवून विद्यार्थांचे  शैक्षणिक नुकसान होत असून गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. अशैक्षणिक कामे शिक्षकांकडून काढून टाकण्यात यावे व शिक्षकांना फक्त शिकवू द्यावे, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटना म. रा. शाखा जिल्हा गोंदियाने केली आहे.
अनु.जाती तील सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत सरसकट शिष्यवृत्ती द्या
 अनुसूचित जाती प्रवर्गातील इयत्ता पहिली पासून आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा गोंदिया चे अध्यक्ष संजय उके यांनी निवेदनातून केली आहे. मागणीचे निवेदन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.
     अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना इयत्ता १ ली पासून शिष्यवृत्ती मिळत नाही.  इमाप्र(ओबीसी) प्रवर्गातील  विद्यार्थी – विद्यार्थीनी यांना इयत्ता १ ली पासून १० वी पर्यंत भारत सरकार मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती, अनु. जमाती तील १ ली पासून १० वी च्या विद्यार्थी -विद्यार्थीनी यांना  सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती, विमुक्त जाती भटक्या जमाती तील विद्यार्थी – विद्यार्थीनी यांना इयत्ता १ ली पासून १० वी पर्यंत डॉ. आंबेडकर मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती मिळत आहे. सावित्री बाई फुले शिष्यवृत्ती योजना  इयत्ता ५ ली ते १० वी (एस.सी, एस.बी.सी.,ओ.बी.सी., व्ही.जे.एन. टी. संवर्ग), गुणवत्ता शिष्यवृत्ती इयत्ता ५ ते १० वी( एस.सी. एस.टी., एस.बी.सी., व्ही.जे.एन.टी. संवर्ग), १० वी परीक्षा फी (एस सी. एस. टी. एस बी.सी., व्ही.जे एन. टी. संवर्ग), अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती मिळत आहे.  अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थीनींना इयत्ता १ ली पासून ४ थी पर्यंत शिष्यवृत्ती मिळत नाही व  विद्यार्थांना इयत्ता १ ली पासून ८ वी पर्यंत त्या प्रकारे सरसकट शिष्यवृत्ती मिळत नाही. अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थी – विद्यार्थीनी शिष्यवृत्ती पासून वंचित राहत आहेत. त्यामुळे  अनु. जाती प्रवर्गातील सर्व विद्यार्थी –  विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली पासून ८ वी पर्यंत सरसकट शिष्यवृत्ती देण्यात येईल असा आशावाद संजय उके यांनी व्यक्त केला आहे.