२०२४ पर्यंत गोंदिया जिल्ह्यात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार

0
20

ग्राम कवलेवाडा येथे ३४९.१२ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन 

गोरेगाव : हर घर नल हर घर जल अंतर्गत प्रत्येक घराला नळ जोडणी द्वारे प्रती मनुष्य प्रति दिवस ५५ लिटर पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबेल सोबतच उन्हाळ्यात पाण्याच्या होणाऱ्या टंचाई पासून मुक्ती मिळेल. त्याच अनुषंगाने ग्राम कवलेवाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर योजनेवर एकूण 349.12 लक्ष रुपये खर्च करण्यात येणार असून प्रत्येक घराला नळ जोडणी द्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

यावेळी पंकज रहांगडाले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात आपल्या सेवा सुशासन आणि गरीब कल्याणासाठी कार्य केले असून ग्रामीण भारताचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य केले आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण १२२२ योजनांचे काम सुरू असून एकूण ८५० गाव आणि कसबे यात पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. यासाठी एकूण ४७६ कोटी रुपये खर्च होणार असून आतापर्यंत जवळपास २५० योजना पूर्ण झाल्या आहेत आणि ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी घरपोच मिळू लागले आहे. उर्वरित योजना २०२४ पर्यंत कार्यान्वित होतील असा विश्वास पंकज रहांगडाले यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार हेमंतभाऊ पटले, जि.प. सदस्य जितेंद्र कटरे, शैलेश नंदेश्वर,पवन पटले, पंस. उपसभापती राजकुमार यादव, विजूभाऊ राणे, पंस सदस्य सुप्रियाताई गणवीर, चित्रलेखाताई चौधरी, कृ.ऊ. बा.स. सभापती पिंटूभाऊ रहांगडाले, शकुंतलाताई कटरे सरपंच कवलेवाडा तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.