गोंदिया, दि.9 : गोंदिया नगर परिषद हद्दीतील क्षेत्राचे नगर भूमापन करण्याकरीता महाराष्ट्र शासनाच्या 27 जुलै 2020 चे शासन निर्णयानुसार तसेच जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, पुणे यांचे 27 एप्रिल 2020 चे पत्रानुसार पथदर्शी प्रकल्पाकरीता निवड करुन ड्रोन द्वारे भूमापनाचे काम दि.2 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्ण झालेले आहे. त्यानुषंगाने पथदर्थी प्रकल्प नगर परिषद गोंदियाचे हद्दीमध्ये समाविष्ट गावातील क्षेत्राचे व हद्दीचे सीमा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. ड्रोन द्वारे भूमापन झालेल्या क्षेत्राचे नकाशे उप अधीक्षक, भूमी अभिलेख गोंदिया कार्यालयास प्राप्त झाले आहे. सदर नकाशा डिजीटल फॉर्मेट मध्ये असल्याने त्यांचा वापर करण्याकरीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, पुणे यांचे कार्यालयाकडून आज्ञावली विकसित करुन प्रत्येक मिळकतींचे (घर, खाली प्लॉट इत्यादी) जागेवर जाऊन चौकशी करण्यात येणार आहे व प्रत्येक मिळकतींचे मालक/ धारक यांची नोंद करुन आज्ञावलीद्वारे नकाशामध्ये प्रत्येक मिळकतींचा वेगळा नकाशा तयार केला जाणार आहे. यामुळे प्रत्येक मिळकतींचे क्षेत्र किती आहे, त्यांची हद्द व मालक/ धारक यांची नोंद होणार आहे.
यामुळे शहर वासियांचे नागरी हक्काचे संवर्धन होईल. शहराचे रस्ते, शासनाच्या मिळकती, खुल्या जागा, नाले इत्यादींच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमणे थांबविता येईल. तसेच प्रत्येक मिळकत धारकांना त्यांचे हक्काचे पुरावे प्राप्त होतील. मिळकत धारकांना त्यांच्या मिळकतीवर कर्ज तसेच इतर सुविधा उपलब्ध होऊन नगर परिषदेची कर आकारणी, बांधकाम परवानगी यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल. याकरीता उप अधीक्षक भूमी अभिलेख गोंदिया कार्यालयाकडून प्रायोगिक तत्वावर नगर परिषद हद्दीतील वार्ड क्र.10 व 13 ची निवड केली असून सदर दोन्ही वार्डामध्ये चौकशीचे काम सुरु आहे.
तरी वार्ड क्र.10 व 13 मधील मिळकत धारकांना/नागरिकांना उप अधीक्षक भूमी अभिलेख गोंदिया कार्यालयाकडून आवाहन करण्यात येते की, आपण घरी/जागेवर सदर कार्यालयाकडून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. तसेच मिळकतींचे धारक/मालक ठरविण्याकरीता नागरिकांनी त्यांचे मालकीयत जमिनीचे पुरावे जसे- सातबारा, खरेदी खत, कर पावती तसेच आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी इत्यादींची माहिती पुरवावी. असे उप अधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद बोकडे यांनी कळविले आहे.