गोंदिया,दि.09ः अदानी फाउंडेशन तिरोडा, जिल्हा प्रशासन,महिला आर्थिक विकास महामंडळ व फार्मर प्रोडूसर कंपनीच्या संयुक्त माध्यमातून नव तेजस्विनी दुग्ध शीतकरण कार्यक्रमांतर्गत तिरोडा तालुक्यातील ग्राम सेजगाव येथे 20 गावातील 20 महिला बचत गटांना जिल्हाधिकारी डॉ.चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते दूध संकलन केंद्र साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने माविमचे जिल्हा समन्वयक संजय संगेकर,अदानी फाऊंडेशनचे प्रमुख बिमुल पटेल,तिरोडा क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सेजगाव ग्रामपंचायतचे सरपंच उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी गोतमारे यांनी दुग्ध व्यवसायातून आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला आर्थिक सक्षम होतील तसेच त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात सुद्धा भर पडेल. सोबतच कुटुंबाच्या उदरनिर्वाह मध्ये सुद्धा त्यांचा हातभार लागणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय संगेकर यांनी केले व कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया,अदानी फाउंडेशन तिरोडाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन सारिका बनसोडे तर आभार प्रदर्शन अनिता आदमने यांनी मानले.