नवीन इमारतीतील त्रुट्या दूर करण्याचे आश्वासन
१०० बेडच्या रुग्णालयाचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश
रस्ते विकासासाठी बिरसा मुंडा रस्ते विकास योजनेतून निधी देणार
गुटकाबंदीवर प्रभावी अंमलबजावणीसंबंधी पोलिस प्रशाशनाला सूचना
देवरी,दि.२६- तालुक्यातील दोन लाख लोकांच्या सेवेसाठी ग्रामीण रुग्णलायाची प्रशस्त इमारत तयार करण्यात आली. या इमारतीतून जनतेला आरोग्याच्या उत्तम सेवा मिळणे अपेक्षित आहे. इमारतीच्या स्वच्छतेवर अधिक भर देत इमारत दिली त्या अवस्थेत ठेवण्याची जबाबदारी आरोग विभागाच्या प्रशासनावर आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाबा धर्मराव आत्राम यांनी आज बुधवारी ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले.
ते देवरी येथे आयोजित ग्रामीण रुग्णालयाच्या लोकापर्ण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देवरी नगराध्यक्ष संजू ऊईके, पंचायत समिती सभापती अंबिका बंजार, जिल्हा परिषदेच्या सभापती सविता पुराम, गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक बनकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष छोटेलाल बिसेन, भाजपचे तालुका अध्यक्ष प्रवीण दहिकर, माजी जि.प सदस्य रमेश ताराम, माजी आमदार संजय पुराम, देवरी पंसचे उप सभापती अनिल बिसेन, जिप सभापती पूजा सेठ, देवरी नगर पंचायतीच्या उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार आदी अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार यांनी आपल्या भाषणात विद्यमान आमदारांनी केलेल्या लोकार्पण सोहळ्यासंबंधी व्यक्त केलेल्या भावनांचा धागा पकडून पालकमंत्री आत्राम यांनी विकासकामे शासन करीत असते. यासाठी सर्वांनी पाठपुरावा करायचा असतो. कोण्या एकट्याने मी केले म्हणण्याचे कारण
नाही, अशी कोपरखळी ना. आत्राम यांनी यावेळी बोलताना लगावली. ते पुढे बोलताना म्हणाले की आपल्या भागात रस्ते-पुलांच्या अनेक समस्या आहेत. यासाठी बिरसामुंडा रस्तेविकास योजनेतून रस्ते आणि पूल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देऊ. याशिवाय एसी-एसटी प्रमाणे ओबीसींना सुद्धा घरकूल मोठ्या प्रमाणावर देण्याची शासनाची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात होणाऱ्या ड्रग्स आयातीवर चांगलीच चिंता व्यक्त केली. या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावण्याचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला. ते पुढे म्हणाले की, देवरी हे तालुक्याचे ठिकाण वर्दळीच्या महामार्गावर असल्याने अपघातग्रस्तांना सुद्धा उपचार मिळावेत यासाठी येथे १०० खाट्यांच्या रुग्णालयाचे प्रस्ताव लवकर तयार करून सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
प्रास्ताविक देवरी ग्रामीण रुग्णलयाचे वैदयकीय अधीक्षक गगन गुप्ता यांनी केले. यावेळी डॉ. गुप्ता देवरी तालुक्यातील रुग्णाची सेवा चांगल्या प्रकारे करण्यात यावी, यासाठी नव्या इमारतीमध्ये असलेल्या त्रुट्या दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांना विनंती केली. या नवीन इमारतीचे हस्तातरण आणि आवश्यक असलेल्या संबंधित प्रशासकीय विभागाचे नाहरकत प्रमाणपत्रे, अपूरी कर्मचारी संख्या, ट्राम केअर युनिट आदी समस्यांवर माननीय पालकमंत्र्याचे लक्ष वेधले.
खा. नेते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्र आणि राज्या शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांचा उहापोह केला. खा. नेते यांनी गरजूना मोफत औषधोपचार करता यावा म्हणून आयुष्यमान भारत योजनेसह आभा कार्ड काढण्याचे आवाहन करत आरोग्य विभागाला त्या संबंधी सूचना दिल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी गोतमारे, मुकाअ पाटील, जिल्हा शल्यचिकित्सत मोहबे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचलन ग्रामीण रुग्णालयाचे तंत्रज्ञ वंजारी यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. लांजेवार यांनी मानले. यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.