दत्तोरा येथील विद्युत समस्या तात्काळ सोडवा

0
13

अन्यथा आंदोलन करू,गावकऱ्यांचा इशारा

देवेंद्र रामटेके
गोंदिया( ता.29) मागच्याअनेक दिवसापासून गावातील विद्युत पुरवठा मोठ्या प्रमाणात लपंडाव करीत आहे. त्यात अनेक तासनतास विद्युत पुरवठा बंद राहणे ही नित्याचीच बाब झाली आहे. अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे गावकरी व येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत.सदर विद्युत पुरवठ्याची समस्या तात्काळ सोडवा अन्यथा आंदोलन करू असा इशारा गोंदिया तालुक्यातील दत्तोरा येथील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी दिला आहे.
येथील लोकसंख्या जवळपास दोन हजाराच्या वर असून येथे जवळपास पाचशे च्या वर मीटर धारक आहेत.त्यातही मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. असे असले तरी येथे विद्युत पुरवठ्याचा मोठा खेळ खंडोबा नेहमीच सुरू असतो. अनेक तासनतास विद्युत पुरवठा बंद राहणे हे येथे नित्याचीच बाब झाली आहे. सदर प्रकार मागच्या अनेक महिन्यापासून अविरत सुरू आहे.या संबंधात अनेक तक्रारी येथील गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी महावितरण कडे केल्या आहेत.मध्यंतरी गावकऱ्यांचे शिस्तमंडळ सुद्धा महावितरणच्या कार्यालयावर धडकले होते. असे असले तरी अद्यापही महावितरण ने सदर समस्या सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही.सध्या शेतकऱ्यांचे धान पीक अंतिम टप्प्यात असून त्यास पाण्याची नितांत आवश्यकता आहे. अशा परिस्थितीतही विद्युत पुरवठा लपंडाव करीत असल्यामुळे येथील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.सदर समस्या सोडविण्यासाठी येथील गावकऱ्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनाही साकडे घातले परंतु समस्या ‘जैसे थे’ च्या स्थितीतच आहे. या संबंधात रावनवाडी येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रत्युत्तर दिले नाही. सदर समस्या तात्काळ सोडवुन गावातील विद्युत पुरवठा नियमित करावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा येथील गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.