सुरक्षित दिवाळी साजरी करीत सणाचा आनंद व्दिगुणित करा

0
18

नागपूर दि. 2 नोव्हेंबर:- प्रकाशपर्व अर्थात दिवाळसणाला काही दिवसच शिल्लक असून तयारीची लगबग सुरु झाली आहे. सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण आहे, ह्या दिवाळीचा आनंद अधिक व्दिगुणित करण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले असून, समस्त वीज ग्राहकांना, कर्मचा-यंना आणि हितचिंतकांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या आहेत.

दिवाळीत होणाऱ्या रोषणाई मुळे विज यंत्रणेवर ताण पडतो अश्यावेळी वीजेचा गरजेनुसार वापर करण्यात यावा. बाजारात कमी वीज लागनारे एलईडी दिवे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करून वीजवापर कमी ठेवा. दिवाळीत होणारी सजावट, विद्युत रोषणाई आणि आतिषबाजी यामुळे दुर्दैवी घटना व्हायला एक कारण पुरेसे आहे, अश्या घटनांनी आनंदाचे वातावरण दु:खात बदलायला वेळ लागत नसल्याने अश्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. दिवाळीच्या दिवशी फटाक्याने लागलेल्या आगीच्या घटना दरवर्षीच हजारोच्या संख्येने होत असतात, यात केवळ आर्थीकच नव्हे तर जिवीत हानीही मोठ्या प्रमाणात होत असते. सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने, निष्काळजीपणा आणि उदासिनता यामुळे अश्या घटना होत असतात. आपल्या व आपल्या कुटुंबियांचा दिवाळीचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी महावितरणने काही खबरदारीचे उपाय सुचविले असून त्यावर अंमलबजावणी करण्याचे आवाहनही मुख्य अभियंता यांनी केले आहे.

 दिवाळी आणि दिवे यांचे एक अतूट नाते आहे, त्यामुळे दिव्यांनी घराची सजावट करतांना ती मोकळ्या जागेत लावावी. पडदे, बिछाना यापासून ते लांब असतील याची काळजी घ्यावी. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दुर आणि उंचीवर तसेच पंखे, वीजतारा यापासूनही ते दुर ठेवावेत. उच्च दर्जाच्या दिव्यांच्या माळांचा वापर करावा, तुटलेल्या वीज तारा वापरु नये किंवा जोड देतांना योग्य दर्जाच्या इन्सुलेशन टेपने त्या सुरक्षित करुन घ्यावेत, तुटलेले सॉकेट्स वापरू नये, घरात कुणीही नसतांना सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत. फ़टाके उडविल्यानंतर त्याचा होणारा कचरा वीज यंत्रणेजवळ फ़ेकू नका, त्या कच-याची योग्य विल्हेवाट लावा, असे आवाहन करतांना महावितरणने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

येणा-या प्रकाशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा म्हणून वीज वाहिन्या व वीज उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांना केल्या असून वीज तारांच्या लगतच्या झाडांच्या फ़ांद्या तोडणे, रोहीत्रे, वितरण पेट्यांची आवश्यक ती दुरुस्ती करणे, उपकेंद्रातील उपकरणांची तपासणी व दुरुस्ती करणे, नादुरुस्त असलेले किटकॅट बदलणे, रहदारीच्या ठिकाणी लघुदाव व उच्च दाब वाहिन्यांचे गार्डींग व्यवस्थित करून घेणे, योग्य क्षमतेचे वितळ तार (फ़्यूज वायर) टाकणे, विभागिय, मंडळ आणि क्षेत्रिय स्तरावरील नियंत्रण कक्ष तीन्ही पाळ्यांत (24X7) सुरु ठेवणे आदी कामे प्राधान्याने करण्याचे निर्देश दिल्याचेही दिलीप दोडके यांनी सांगितले.

दिवाळसणात मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग असल्याने अश्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वीज अपघात होणार नाही यासाठी बाजारपेठ परिसरातील कर्मचा-यांनी दक्ष राहून योग्य त्या उपाययोजना करणे, या काळात वीजपुरवठा अखंडित राहील यासाठी विभागिय अधिकारी, उपविभागिय अधिकारी व शाखा अधिकारी यांनी दिवाळी पुर्ण होईपर्यंत स्वत: जातीने उपस्थित राहण्यासोबतच या संपुर्ण प्रकाशपर्वादरम्यान सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी मुख्यालयी असणे बंधनकारक असून सक्षम अधिका-यांच्या परवानगीशिवाय कोणीही मुख्यालय सोडू नये, अश्या सुचनाही सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन जनमित्र पातळीपर्यंत याबाबत सर्वांना आवश्यक ते दिशानिर्देश दिले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

हे लक्षात असू द्या :-

  • रोषणाईसाठी कमी वॅटच्या एलईडी दिव्यांचा वापर करा.
  • विद्युत सॉकेट्सवर अधिक भार टाकू नये.
  • रोषणाईसाठी वापरण्यात येणारे विद्युत दिवे त्यांच्या तारा व सॉकेट्स तपासून घ्याव्यात.
  • वीज तारा जवळ फटाके उडवू नये.
  • विजेच्या उपकरणांजवळ फटाके ठेवू नये.
  • फटाके उडवताना मोकळ्या जागेत उडवावी.
  • फटाक्यांची आतिषबाजी करतांना आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात.
  • फ़टाक्यांचा कचरा वीज यंत्रणेजवळ फ़ेकू नका.