बिरसी कॅम्प येथील बांग्लादेशी शरणार्थ्यांना मदत

0
8

गोंदिया,दि.२७ : २१ मे रोजी आलेल्या चक्रीवादळाने बिरसी कॅम्प येथील बांग्लादेशी शरणार्थ्यांच्या घरावरील छपरे उडून गेल्यामुळे तेथील १७ कुटुंब बेघर झाली. या शरणार्थ्यांना तातडीने मदत करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी नुकतीच तातडीने बैठक घेऊन त्यांना मदत करण्याचे निर्देश दिले.
या कॅम्पमध्ये एकूण ४१ शरणार्थी कुटुंब राहत असून चक्रीवादळाने १७ कुटुंबांच्या घरावरील छपरे उडून गेली. महसूल विभागाकडून तातडीने घर नुकसानीची मदत करण्यात आली. उडालेल्या छपरांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांना दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची दुरुस्ती करण्यात यावी असेही जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले. ४१ कुटुंबांना शासन निर्णयानुसार ज्या सुविधा देण्यात येत आहे त्या सुविधा यापुढेही सुरु ठेवण्याचे व त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी विमानतळ प्राधिकरण यांच्यामार्फत महिला व बाल कल्याण विभागाने पाठपुरावा करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचविले. सभेला उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, अप्पर तहसिलदार के.डी.मेश्राम उपस्थित होते.