तिवस्यात खासदार डॉ. अनिल बोंडेंवर दगडफेक

0
11

एक दगड लागल्याने दुखापत, शंकरपटातील घटना
अमरावती : तिवसा येथील बैलगाडा शर्यतीदरम्यान (शंकरपट) भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यावर दगडफेक करण्यात आली. त्यात एक दगड खांद्यावर लागल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.

तिवसा येथील नवीन कोर्टामागील खुल्या जागेत शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. या शंकरपटाला खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास भेट दिली. मैदानावर बैलगाडी शर्यतीची पाहणी केल्यानंतर ते स्टेजकडे परत जात होते. त्याचवेळी मैदानातील गर्दीतून अज्ञाताने दोन दगड डॉ. अनिल बोंडे यांच्या दिशेने भिरकाविले. त्यापैकी एक दगड डॉ. अनिल बोंडेंच्या यांच्या डाव्या खांद्यावर लागला. तर दुसरा दगड त्यांच्या सुरक्षारक्षकाला लागला. दगड लागल्याने डॉ. अनिल बोंडे यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉ. अनिल बोंडे यांच्यावरील दगडफेकीच्या या प्रकारामागे राजकीय हाथ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी डॉ. अनिल बोंडे यांच्यातर्फे सुबोध सतीश देशमुख (३९) रा. धामणगाव देव, तिवसा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार प्रदीप ठाकूर करीत आहेत.

—कोट

शंकरपटातील गर्दीतून अज्ञाताने खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या दिशेने दगड भिरकाविले. एक दगड डॉ. बोंडे यांच्या खांद्यावर लागला. यासंदर्भात त्यांच्यामार्फत तक्रार प्राप्त झाली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

प्रदीप ठाकूर, ठाणेदार, तिवसा