बालविवाह होणार नाही यासाठी पालकांमध्ये जनजागृती करा-जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

0
5

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा आढावा

 वाशिम, दि. 27   मुलींसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांची माहिती मुलींसह त्याच्या पालकांना करुन द्यावी. जिल्हयात 18 वर्षाआतील एकाही मुलींचा बालविवाह होणार नाही यासाठी पालकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले.

       26 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा आढावा आयोजित सभेत घेतांना अध्यक्षस्थानावरुन श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) संजय जोल्हे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी राजेश शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, जिल्हा औषधी निर्माण असोशिएशनचे अध्यक्ष राजेश सिरसाठ, स्वयंसेवी संस्थेच्या सोनाली ठाकूर, डॉ. प्रेमलता आसावा, डॉ. अल्का मकासरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

       श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, कुटूंब नियोजनाबाबत क्षेत्रीय पातळीवर व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. आशा कार्यकर्तीच्या माध्यमातून कुटूंब नियोजनासाठी जास्तीत जास्त जोडप्यांना प्रोत्साहित करण्यात यावे. जिल्हयातील काही ग्रामपंचायतीमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण 1000 पेक्षा जास्त आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. ज्या मुलींचे बालविवाह होवून बाळंतपण झाले आहे, त्यांची काळजी घेण्यात यावी. 18 वर्षानंतरच त्या मुलींचे बाळंतपण होण्यासाठी त्यांचे समुपदेशन आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी करावे. असे त्यांनी सांगितले.

       जिल्हयातील सोनोग्राफी केंद्रावर गर्भलिंग निदान चाचणी होते का यासाठी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करावी. असे सांगून श्रीमती बुवनेश्वरी पुढे म्हणाल्या, 10 वी नापास झालेल्या मुलींचे पुढेही शिक्षण घेणे कायम राहावे. यासाठी अशा मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे. मुलींच्या जन्माचे स्वागत करणारे अनेक उपक्रम राबविण्यात यावे. 18 वर्षाखालील लग्न झालेली मुलगी उपचारासाठी रुग्णालयात आली तर तिला चांगले उपचार करण्यात यावे असे त्या म्हणाल्या.

      श्री. जोल्हे यांनी लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे हे ‘बेटी बचाआ बेटी पढाओ’ या अभियानाचे उद्दिष्ट असल्याने सांगितले. जिल्हयात 3 ते 6 महिन्यापर्यत जिल्हयातील एकूण 491 ग्रामपंचायतीपैकी 134 ग्रामपंचायतीमध्ये 1000 पैक्षा जास्त मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण आहे. या अभियानातंर्गत अनधिकृत गर्भपात, गर्भलिंग तपासाणी याबाबतच्या तक्रारी असल्यास 1800233475 या क्रमांकावर संपर्क साधावा. सन 2023-24 या वर्षात जिल्हा परिषद उपकर व अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 210 मुलींना प्रत्येकी 10 हजार रुपये या प्रमाणे अर्थसहाय्य करण्यात आल्याची माहिती श्री. जोल्हे यांनी यावेळी दिली.

     सभेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी व काही विभाग प्रमुखांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संबंधितांनी आपल्या विभागामार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती यावेळी दिली.