कंत्राटी ग्रामसेवक हिंगेच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी-ग्रामसेवक संघटना

0
54

गोंदिया,दि.12- देवरी तालुक्यातील डवकी/शिलापूर येथील कंत्राटी ग्रामसेवक मोहन हिंगे यांनी आपल्या राहत्या घरी केलेल्या आत्महत्येमुळे ग्रामसेवक संवर्गात एकच खळबळ उडाली असून ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी संघटनेच्यावतीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात मृत ग्रामसेवक हिंगे यांना  अनुकंपा तत्त्वावर त्यांना नियुक्ती देण्यात आल्याचे म्हटले असून कुटुबियांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून अतिशय सोज्वळ व्यक्तिमत्व होते.घरात कोणताही वाद नसतानाही,अशा स्थितीत त्यांनी केलेली आत्महत्या शंका निर्माण करणारी आहे.देवरी पंचायत समितीस्तरावर मिळालेल्या माहितीतून काही स्थानिक आरटीआय कार्यकर्ते मानसिक त्रास देऊन ब्लॅकमेल करीत असल्याचे तसेच काही स्थानिक अवैध ठेकेदार बिल काढून देण्याकरीता राजकीय दबाव देत असल्याची माहिती समोर आल्याचे म्हटले आहे.त्यामुळे आत्महत्या करण्यामागे काही आरटीआय कार्यकर्ते अथवा स्थानिक कंत्राटदार,पदाधिकारी हे कारणीभूत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोहन हिंगे यांचे मागील एक महिन्यातील भ्रमणध्वनीचे संभाषण तपासल्यास बरेच काही माहिती मिळण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.त्यामुळे सदर प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून त्वरित सखोल चौकशी करण्याचे निर्देश द्यावे जेणेकरून त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत जे असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करुन न्याय देता येईल असे म्हटले आहे.सोबतच सखोल चौकशी न केल्यास महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनए 136 शाखा गोंदियाच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कंत्राटी ग्रामसेवक मोहन हिंगे यांनी आत्महत्या करणे दुर्दैवी आहे.ग्रामसेवक संवर्गावर सर्वच स्तरावरून शासनाच्या योजना,विकास कामे,स्थानिक संस्था कामे अधिकारी पदाधिकारी यांची कामे ,लोकसेवा,विविध अभियान राबवितांना प्रचंड ताण दिला जातो.अनेक विपरीत परिस्थितीच हा संवर्ग काम करीत असताना काही असामाजिक तत्त्व आरटीआई कार्यकर्ते,अवैध ठेकेदार,ठेकेदारी करणारे पदाधिकारी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करुन दबाव घालून नियमबाह्य कामे करायला भाग पाडतात.त्यामुळे अश्या दुर्दैवी घटना घडण्याचे प्रकार वाढले आहे.त्यामुळे या विषयाची सखोल चौकशी करून जबाबदार दोषीवर त्वरित कार्यवाही करून हिंगे परिवाराला न्याय देण्यात यावे.
कमलेश बिसेन
जिल्हाध्यक्ष
ग्रामसेवक ,ग्राम विकास अधिकारी युनियन