Home विदर्भ बिबट्याच्या बछड्याचे रेस्क्यू यशस्वी

बिबट्याच्या बछड्याचे रेस्क्यू यशस्वी

0

गोंदिया. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वन परीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बिट केशाेरी येथील कक्ष क्रमांक ७५० मधील केळवद येथील शेतशिवारात एक बिबट्याचा बछडा दडी मारून बसला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नवेगावबांध येथील रेस्क्यू पथकाला पाचारण केले. या पथकाने बिबट्याच्या बछड्याला यशस्वीपणे रेस्क्यू केले. ही घटना (दि.२२) घडली.
प्राप्त माहितीनुसार, केशोरीलगत असलेल्या केळवद शेतशिवारात आंब्याच्या झाडाखाली झुडुपात एक बिबट्याचा बछडा दडून बसला असल्याचे या परिसरातील शेतकऱ्यांना आढळला. त्यांनी लगेच याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळताच, वनपरीक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी, तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी अधिकारी एम.सी.पवार हे घटनास्थळी पाेहोचले. त्यांनी घटनास्थळी बिबट्याच्या बछड्याची पाहणी करून, त्याचे रेस्क्यू करण्यासाठी नवेगावबांध येथील रेस्क्यू चमूला पाचारण केले. यानंतर, या चमूने सोमवारी दुपारी घटनास्थळी पोहोचत, बिबट्याच्या बछड्याला यशस्वीपणे रेस्क्यू केले. बिबट्याच्या बछड्याला पिंजऱ्यात जेरबंद करून त्याला नवेगावबांध येथे नेण्यात आले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. सध्या हा बछडा नवेगावबांध येथे असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

यांनी राबविली रेस्क्यू
मोहीम केळवद परिसरातील शेतशिवारातून बिबट्याच्या बछड्याला नवेगावबांध येथील रेस्क्यू टीमने यशस्वीपणे पकडले. यानंतर, त्याला उपचारासाठी नवेगावबांध येथे नेण्यात आले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी केशोरीचे क्षेत्रसहायक नान्हे, वनरक्षक यू.बी.काळसर्पे, एस.परशुरामकर, ए.गवाले, जी.पटले, जायभाये, टी.कोरे, वनमजूर मेंढे व रेस्क्यू चमूचे मिथून चव्हाण, अमोल चौबे, सतीश शेंद्रे यांचा समावेश होता.

Exit mobile version