जिल्हा परिषद परिसरातील झाडावर मजुरीच्या पैशाकरीता चढला इसम

0
28

गोंदिया,दि.09-गोंदिया जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील एका झाडावर चढून आपल्या मागण्याकंडे लक्ष वेधण्याचे काम गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथील लिखीराम राऊत या नागरिकांने केल्याने एकच खळबळ उडाली आहे.सदर व्यक्ती झाडावर चढल्याची माहिती मिळताच गोंदिया ग्रामीणचे पोलीस व बांधकाम सभापती यांनी धाव घेत सदर व्यक्तीला खाली उतरण्याची विनंती केली.मिळालेल्या माहितीनुसार सन 2012-13 पासून मनरेगा कामाची मजुरी मिळाली नसल्याने मजुरी मिळावी याकरीता झाडावर चढून प्रशासनाचे लक्ष वेधले.सदर व्यक्ती याआधीही जिल्हा परिषदेच्या परिसरातील झाडावर चढला असता आश्वासनानंतर उतरला होता.मात्र त्या आश्वासनानंतरही मजुरी न मिळाल्याने पुुन्हा झाडावर चढून प्रशासनातील हलगर्जीपणा उघडकीस आणला.आज 9 फेब्रुवारीला पुन्हा झाडावर चढला असता बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी शिष्टाई करीत गोरेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना घटनास्थळी बोलविले.मात्र सदर व्यक्तीचे समाधान झाले नाही.आज जोपर्यंत दोषीवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत उतरणार नाही अशी भूमिका घेतली आहे.