भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या- खासदार अशोक नेते

0
18

कचारगड यात्रेचा आढावा

         गोंदिया, दि.20 : पारी कुपार लिंगो माँ कली कंकाली यात्रा कचारगड येथे पाच दिवस साजरी केली जाणार आहे. या यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येणार असून त्यांची गैरसोय होता कामा नये अशा सूचना खासदार अशोक नेते यांनी प्रशासनाला दिल्या. आज कचारगड येथे आढावा सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

         जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी सत्यम गांधी, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे व कचारगड देवस्थान समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे उपस्थित होते.

         कचारगड यात्रेचे आयोजन 22 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2024 दरम्यान (5 दिवस) करण्यात आलेले आहे. पार्किंग व्यवस्था, रस्ते तयार करणे, भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विशेष वैद्यकीय पथक, माहिती फलक लावणे, खाद्य पदार्थ निरीक्षण आणि कायदा व सुव्यवस्था ही जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असल्याचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले.

        सर्व भाविक भक्तांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळायला हवे, भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. खाद्य पदार्थ नियमितपणे तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसाद व जेवण तसेच स्टॉल याबाबत काळजी घ्यावी. या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात येणार आहेत. त्यांची वाहने सुद्धा येतील, त्यासाठी रस्ते चांगले ठेवण्यात यावे. रस्त्यांची डागडुजी करावी, खड्डे असायला नकोत.

        भाविकांची गर्दी होणार असल्याने यात्रेत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात यावा. मोबाईल शौचालय पुरेसे असावे. एसटी बसेसची व्यवस्था करावी. त्याचे मार्ग ठरवून ती माहिती दर्शनीय स्थळी लावावी. नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी असे श्री. नेते यांनी सांगितले.

        तीन ठिकाणी वैद्यकीय कॅम्प लावण्यात आले आहेत. ॲम्बुलन्स सुद्धा ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाने यावेळी सांगितले. पथदिवे लावण्याचे काम सुरु आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुरेशा औषधांचा साठा उपलब्ध करुन ठेवावा. अन्न निरीक्षकाने दुकानातील खाद्य पदार्थांची नियमित तपासणी करावी. कार्यकारी अभियंता सा.बां. विभागाने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेटींग त्वरित लावावे. नगरपंचायत मुख्याधिकारी सालेकसा यांनी अग्नीशमनीची व्यवस्था करावी. नगरपंचायत मार्फत साफ-सफाई करण्याकडे विशेष लक्ष्य दयावे. यात्रे दरम्यान योग्य ठिकाणी 12 सिसिटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जवळपास 500 ते 600 वाहने ठेवण्याची पार्कींग व्यवस्था करण्यात आलेली आहे. व्हीव्हीआयपी मान्यवर आले तर त्यांच्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. यात्रेदरम्यान भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, त्यामुळे सदर यात्रा चांगल्या पध्दतीने पार पडेल याची खबरदारी घ्यावी असे त्यांनी सांगितले.