‘ इतरांनी केलेल्या निंदेला आपले इंधन बनवा ‘ – तहसीलदार अनिरुद्ध कांबळे

0
71

एस. एस. जायस्वाल महाविद्यालयाचा वार्षिकोत्सव ‘घे भरारी’ उत्साहात संपन्न

अर्जुनी मोरगाव – “ आजचा युवक हा स्पर्धा परीक्षांच्या मागे लागला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. यामुळे अनेक लोक आपली निंदा करीत असतात. त्यामुळे अनेकजण निराश होऊन प्रयत्न सोडून देतात. लोकांच्या या निन्देमुळे निराश होण्याचे कारण नाही, लोकांच्या या निंदेचे इंधन बनवा आणि त्या उर्जेने यश संपादन करा. असे इंधन आपल्याला पाहिजे तेवढे मिळू शकते. यशस्वी होऊन लोकांच्या निंदेला उत्तर द्यायला हवा “ असे मौलिक विचार अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी व्यक्त केले. ते स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयाच्या वार्षिकोत्सव ‘घे भरारी’ च्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष लुनकरण चितलांगे हे होते तर प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे, संस्था उपाध्यक्ष बद्रीप्रसाद जायस्वाल, संस्था सचिव मुकेश जायस्वाल, प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले, IQAC समन्वयक डॉ. के. जे. सीबी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. पी. एस. डांगे, वार्षिकोत्सव प्रभारी डॉ. शरद मेश्राम, सह प्रभारी डॉ. गोपाल पालीवाल, क्रीडा प्रभारी प्रा. राजेश डोंगरवार, तसेच सर्व समितीचे समन्वयक प्रामुख्याने उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात तुकडोजी महाराज आणि शिवप्रसादजी जायस्वाल यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या वेळी वार्षिकोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक स्पर्धा यात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले यांनी शुभेच्छा दिल्या व सर्वांचे कौतुक केले.
प्रमुख अतिथी उप विभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांनी “अभ्यासात चिकाटी असल्याने आपण यशाकडे जाऊ शकतो. वेळेचे नियोजन हे अतिशय आवश्यक आहे. गेलेला वेळ परत येत नाही. आभासी जगातून बाहेर पडा आणि वास्तविक जगात वावरणे शिका” असा असे मौलिक मत त्यांनी व्यक्त केले.
या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह वितरीत करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणातून संस्थाध्यक्ष लुनकरण चितलांगे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता महाविद्यालय कटिबद्ध असून त्यांच्या हिताचे विविध उपक्रम महाविद्यालयात चालविले जात असल्याची माहिती दिली
या कार्यक्रमाचे संचालन डिम्पल भेंडारकर आणि वैष्णवी सूर्यवंशी यांनी केले. प्रास्ताविक सहप्रभारी डॉ. गोपाल पालीवाल यांनी तर एकंदरित संपूर्ण घे भरारी वार्षिकोत्सवाचे आभारप्रदर्शन प्रभारी डॉ. शरद मेश्राम यांनी केले. वार्षिकोत्सवाच्या यशस्वितेसाठी सर्व समितींचे समन्वयक व सदस्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.