बारा तास विजेसाठी शेतकरी आक्रमक; महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको

0
41

गोंदिया : महावितरणकडून शेतीसाठी ८ तासांची वीज दिली जाते. परंतु कृषी पंपांना १२ तास वीज पुरवठा करण्यात यावा; या मागणीसाठी  शेतकरी आक्रमक झाले आहेत. याकरिता राष्ट्रीय महामार्ग सहावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोखण्यासाठी बसलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडविले असता शेकडो शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले. धानाचा कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते. खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पिकाची लागवड करत असतात. मात्र  महावितरणच्या वतीने फक्त ८ तास वीज पुरवठा केला जातो. अपुऱ्या वीस पुरवठा अभावी शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम संकटात आले आहे. यासाठी मोरगाव अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ५ दिवस उपोषण केले होते. त्यानंतर महावितरणने १२ तास विद्युत पुरवठा देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते.

तरी देखील शेतकऱ्यांना १२ तास वीज पुरवठा न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्ता रोको आंदोलन केले. मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना रस्ता रोको करण्यापासून अडविले. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. तर संतप्त झालेले शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले आहेत. जोपर्यंत १२ तास विद्युत पुरवठा मिळणार नाही तोपर्यंत कार्यालयासमोरून हटणार नाही; अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.