दारूबंदीसाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एल्गार

0
9

भंडारा : जिल्ह्यात दारूबंदी करावी या मागणीला घेवून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती संघटनेतर्फे गुरुवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यात जिल्हाभरातून आलेल्या महिलांनी जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा एल्गार केला. दिवसभर रणरणत्या ऊन्हात या महिलांनी दारूबंदीच्या घोषणा दिल्या. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास संघटनेचे जिल्हाध्यक्ष सैय्यद जाफरी, अचल मेश्राम, महिला कार्यकर्त्या आदींना ताब्यात घेण्यात आले होते.

भंडारा जिल्हा दारू मुक्त व्हावा याकरीता संघटनेच्या वतीने शासनाला वेळोवेळी निवेदन सादर करण्यात आले. परंतु या निवेदनाला शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेतर्फे एक दिवसीय धरणा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण जिल्हा दारूमुक्त करावा, अशा मागणीला घेवून महिलांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.

भंडारा जिल्ह्यात दारूबंदी करा या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. यावेळी संघटनेचे सैय्यद जाफरी, जिल्हा सचिव देवाजी वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ बडवाईक, मनोहर चामट, यामिनी बांडेबुचे, भगवती निमजे, जिल्हा सल्लागार अचल मेश्राम, अर्चना जांभुळकर,आदी उपस्थित होते.