गोंदिया, दि.7 : राज्य राखीव पोलीस बल हा महाराष्ट्र पोलीस दलातील एक महत्वाचा घटक असून राज्यात व राज्याबाहेर नियुक्त असतांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच नक्षल विरोधी कारवायांमध्ये हे बल उत्कृष्ट भुमिका बजावते. सांमप्रदायिक तणावाची परिस्थिती, सण आणि निवडणूकांच्या दरम्यान राज्य राखीव पोलीस बलाने प्रभावीपणे कार्य केल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी काढले. भारत राखीव बटालियन- 2, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 , बिरसी कॅम्प गोंदिया या आस्थापनेवर 6 मार्च 2024 रोजी ” 76 वा राज्य राखीव पोलीस वर्धापन दिन” उत्साहात व विविध सांस्कृतीक कार्यक्रम करुन साजरा करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी प्रजीत नायर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. समादेशक अमोल गायकवाड मार्गदर्शनाखाली “अंलकरण परेडचे” नियोजन करण्यात आले होते. अंलकारण परेडमध्ये हर्ष फायर परेड व सेंट झेव्हियर्स गोंदिया येथील प्राचार्य रेणु मिश्रा व शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत व देशभक्ती नृत्य सादर केले. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक विविध शस्त्र प्रदर्शनीचे भव्य आयोजनही यावेळी करण्यात आले होते. उल्लेखनीय व वैशिष्टयपुर्ण कामगिरी बजावणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
समादेशक सहायक प्रमोद लोखंडे यांचे अध्यक्षतेखाली हर्ष फायरचे नेतृत्व सहायक समादेशक कमलकांत सिहं व सेकंड पेरड कंमाडर सहायक समादेशक कैलास पुसाम होते. सहभागी पोलीस निरीक्षक धिरज उमळवाडकर, पोलीस निरीक्षक पवनप्रसाद मिश्रा, पोलीस उपनिरीक्षक संतोष कळसकर व सचिन चरडे व 112 पोलीस अंमलदार तसेच निशान टोळीमध्ये पोउपनि प्रदिप शेलोटकर, नरेंद्र परिहार व 6 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला.
समादेशक सहायक प्रमोद लोखंडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात “ध्येय व उद्दिष्टे” राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वोत्कृष्ट राज्य सशस्त्र पोलीस दल बनविणे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. देशाचे व राज्याचे कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या सर्व संकटांना आव्हान देण्यासाठी पुर्णपणे सक्षम बनविणे. तसेच प्रशासन प्रशिक्षण, आरोग्य, कल्याण, शिस्त व वर्तणुक अबाधीत राखुन विविध प्रकारचे अत्याधुनिक, युध्द तत्र कौशल्य, फिल्ड क्राफ्ट व टॅक्टीससह शारिरीक व मानसिक एकाग्रता कायम ठेवण्याकरिता सुदृढ, साहसी, धाडसी, गतिमान, धैयशील बनविणे करिता प्रशिक्षण / प्रात्याक्षिकाव्दारे कठिण व खडतर परिस्थितीचा सामना करण्यास कार्यक्षम बनविणे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाचे संचालन पोलीस अंमलदार ललीत तायवाडे यांनी केलेले असून कार्यक्रमात बटालियनचे पोलीस अधिकारी, अंमलदार व अनुगामी कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय तसेच गांदिया जिल्याहयातील विविध कॉलेज / शाळेचे संचालक / मुख्याध्यापक, शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्र कामठा येथील अंकुश मेश्राम, सहयोग हॉस्पीटल येथील संचालक व त्यांचे सहकारी, विविध विभागाचे शासकीय व निमशासकीय अधिकारी, परसवाडा बिरसी, खातीया, कामठा व झिलमीली येथील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य जेष्ठ नागरिक, विद्यार्थी व भरती पूर्व प्रशिक्षण घेत असलेले स्थानिक उमेदवार मोठया संख्येने हजर होते.