महसुुल कर्मचारी संघटनेला यश,सडक अर्जुनी तहसीलदार काळेना हटवले

0
151

गोंंदिया,दि.16:-–सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयाचे तहसीलदार निलेश काळे यांच्या विरोधात कार्यालयातील महिला कर्मचारी यांच्यासह इतर कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी व महसुल कर्मचारी संघटनेला निवेदन देत बदलीची मागणी केली होती.त्या निवेदनात कार्यालयातील महिला कर्मचार्यांनी होत असलेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल केलेल्या तक्रारीचा पाढा महसुल संघटनेने राज्याच्या महसुल मंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत मांडत तहसलिदार निलेश काळे यांची तत्काळ बदलीची मागणी केली.त्या मागणीला होकार देत महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश काळे यांच्या बदलीचे आदेश काढले असून त्यांच्या ठिकाणी कामठीचे तहसिलदार अक्षय पोयाम यांची नियुक्ती केली आहे.विशेष म्हणजे बेरार टाईम्सने 3 मार्च रोजी सर्वप्रथम महिला कर्मचा-यांना त्रास,तहसीलदार काळेंच्या बदलीकरीता जिल्हाधिका-यांना तक्रार या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.https://www.berartimes.com/vidarbha/188785/

सविस्तर असे की,महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेसोबत 11 मार्च रोजी मुंबई स्थित सह्याद्री अतिथीगृहात महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांची बैठक पार पडली.या बैठकीला महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य समन्वयक राजू धांडे,राज्य अध्यक्ष जीवन अहेर,राज्यसचिव किशोर हटकर,राज्य कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवार,उपाध्यक्ष राज ढोमणे,राज्य सरचिटणीस तथा गोंदिया जिल्हाध्यक्ष आशिष रामटेके,नागपूर जिल्हाध्यक्ष देवेंद्र शिंदोळकर,चंद्रपूर शैलेश धात्रक जिल्हाध्यक्ष व संघटनेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत सडक अर्जुनी तहसिल कार्यालयातील कर्मचा-यांनी दिलेल्या पत्रानुसार निलेश काळे यांनी ३ जुलै २०२३ रोजी तहसीलदार पदाचा प्रभार सांभाळला.तेव्हापासून तहसील कार्यालयातील कर्मचा-यांना त्रास देत आहेत.शासन परिपत्रकानुसार महिला कर्मचा-यास ६ वाजे नंतर थांबविता येत नाही.असे असतांनाही रात्री ९ ते १० वाजेपर्यंत बळजबरीने धमकावून कार्यालयात थांबण्यास बळजबरी करीत असल्याचे म्हटले आहे.सदर अधिकारी मनात येईल तसे कर्मचा-यांशी बेशिस्तपणे वागून महिला कर्मचा-यांना अपमानास्पद वागणूक देतात.सुट्टीच्या दिवशी कार्यालयात या अन्यथा कारणे दाखवा नोटीस,बिन पगारी रजा व निलबंनाची कारवाई करण्यााची धमकी देत असल्याचे म्हटले आहे.यावर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी मुद्दा उपस्थित करुन तहसिलदार काळे यांची तत्काळ बदलीची मागणी केली.त्यावर मंंत्री पाटील यांनीही विषयाचे गांभीर्य लक्षात घेत तक्ताळ अकार्यकारी पदावर स्थानांतरण करण्याचे आश्वासन दिले होते.त्यानुसार 15 मार्च रोजी महसूल विभागाने निलेश काळे यांना सडक अर्जुनी तहसिलदार पदावरुन हटविण्यात येत असल्याचे आदेश काढल्याने महसुुल कर्मचारी संघटनेच्या एकजुटीचा विजय झाला आहे.वादग्रस्त तहसीलदार निलेश काळे यांची बदली करण्यात संघटनेला यश आले असून अशा कर्मचारी विरोधी मानसिकतेच्चाय वृत्तीला कधीही थारा दिला जाणार नाही असे राज्य सरचिटणीस व संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष रामटेके यांनी म्हटले आहे.