एसटीच्या विभाग नियंत्रकाला तीन महिन्यांची शिक्षा

0
32

वर्धा,दि.०८- :- राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाचे नियंत्रक संदीप शरद रायलवार यांना बुलढाणा (Buldhana) येथील कामगार न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा (punishment)ठोठावली आहे. एका कर्मचाऱ्याच्या नियुक्ती प्रकरणात त्यांनी केलेल्या हलगर्जी आणि न्यायालयाच्या आदेशाच्या अवमानप्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याविषयीचा निकाल बुलढाणा कामगार न्यायालयाचे (Labor Court) न्यायाधीश ए.जी. मगर यांनी दिला आहे.

बुलढाणा कामगार न्यायालयाचा निकाल

एसटी महामंडळात(ST Corporation) चालक पदावर कार्यरत असताना भाऊराव शिरसाट यांना २०१३ मध्ये बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात कामगार न्यायालयात नंदा शिरसाट यांनी त्यांचे वारस म्हणून पुढेही लढा सुरूच ठेवला. यात कामगार न्यायालयाने १२ नोव्हेंबर २०१२ रोजी तांत्रिकदृष्ट्या (निधनामुळे) भाऊराव शिरसाट यांना कामावर घेत त्यांच्या नोकरीतील सातत्य ठेवत मागील वेतन, त्याचबरोबर निवृत्तीवेतन देण्याचा आदेश कामगार न्यायालयाने दिला होता. राज्य परिवहन महामंडळ(State Transport Corporation) या प्रकरणात औद्योगिक न्यायालयात गेले होते. कामगार न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी वारस नंदा शिरसाट यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकाप्रकरणी कामगार न्यायालयाने संदीप रायलवार यांना तीन महिन्यांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी एकत्रित शिक्षा सुनावली आहे. नंदा शिरसाट यांच्या वतीने ॲड. प्रमोद वर्मा तर विभाग नियंत्रक यांच्या वतीने ॲड. एस.आय. राखोंडे यांनी कामकाज पाहिले.