Home विदर्भ नक्षली अडथळ्यांविना आटोपली गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणूक

नक्षली अडथळ्यांविना आटोपली गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणूक

0

गडचिरोली : नक्षल्यांच्या दहशतीमुळे राज्यात सर्वाधिक संवेदनशिल असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात यावेळी पहिल्यांदाच कोणत्याही नक्षली अडथळ्याविना निवडणूक पार पडली. यासाठी पोलिस यंत्रणेने 15 हजार सुरक्षा जवान आणि नऊ हेलिकॅाप्टरच्या मदतीने चांगले नियोजन केले. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात झालेल्या पाच लोकसभा मतदार संघांमध्ये सर्वाधिक 71.88 टक्के मतदानही गडचिरोली-चिमूर या लोकसभा क्षेत्रात नोंदविल्या गेले.

दिनांक 19 एप्रिल रोजी पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली पोलिस दलाने अतिशय उत्तम नियोजन व प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. गडचिरोली पोलिस दलाचे हे ऐतिहासिक यश ठरले आहे.

जिल्ह्रात विविध पोलिस दलातील सुरक्षा जवानांसह एकुण 15 हजारच्या घरात जवानांचा फौजफाटा बंदोबस्ताच्या कामी तैनात करण्यात आला होता. अतिदुर्गम भागातील आदिवासी नागरिकांनी नक्षली दहशतीला न जुमानता लोकशाहीवर आपला विश्वास व्यक्त करत मोठया प्रमाणावर भरघोस मतदान केले. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांनी बॅनर व पोस्टरबाजी करुन दुर्गम, अतिदुर्गम भागातील नागरिकांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये अतिदुर्गम भामरागड तालुक्यात पंचक्रोशीतील नागरिकांनी नक्षली बॅनरची होळी करत 59.54 टक्के मतदानाची नोंद करत नक्षलवाद्यांना जोरदार चपराक लगावली आहे.

मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गडचिरोली पोलिस दलातील सी-60 जवानांनी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान राबविले. यासोबतच पोलिस स्टेशन कोठी परिसरात नक्षलवाद्यांनी पोलिस जवानांचा घातपात घडविण्यासाठी बीजीएलचा मारा करुन पळून गेले. परंतू पोलिस जवानांनी त्याचा सतर्कपणे सामना करत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. सी-60 च्या जवानांनी लांब पल्ल्याचे व आखुड पल्ल्याचे प्रभावी अभियान राबविल्यामुळे निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्यास मदत झाली.

आंतरराज्यीय बैठकांमधून नियोजन

निवडणुकीच्या पूर्वीच गडचिरोली जिल्ह्रालगत असलेल्या छत्तीसगड व तेलंगणा राज्यातील लगतच्या जिल्ह्रांमधील वरिष्ठ अधिका­ऱ्यांसोबत 5 आंतरराज्यीय बैठका घेण्यात आल्या होत्या. सदर बैठकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील गोंदिया, चंद्रपूर व भंडारा, तेलंगणा राज्यातील कुमरामभिम, भुपालपल्ली व मंचेरीयल, तसेच छत्तीसगड राज्यातील बिजापूर, नारायणपूर, कांकेर, मोहल्ला मानपूर व राजनांदगाव या जिल्ह्राच्या सीमावर्ती भागात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून निवडणुकीसंदर्भाने महत्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत योग्य ती व्युहरचना आखल्याने लोकसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यास मदत झाली.

2019 च्या निवडणुकीतील नक्षली अडथळे

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये पोस्टे गट्टा (जां.) हद्दीमधील मौजा वटेली, पुस्कोटी, गर्देवाडा व वांगेतुरी या भागात नक्षलवाद्यांनी आयडी ब्लास्ट व गोळीबार करुन निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्यावर मात करत गडचिरोली पोलिस दलाकडून सदर भागात निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली होती. सदर बाब लक्षात घेत यावेळी गडचिरोली पोलिस दलाने नव्याने उभारलेल्या वांगेतुरी, गर्देवाडा व पिपली बुर्गी या पोलीस स्टेशनमुळे सदर भागातील जनतेमध्ये नक्षलवाद्यांबद्दल असलेली भिती नाहीशी करण्यात यश मिळविले. त्यामुळे त्या भागातील नागरिकांनी मतदान करुन लोकशाहीच्या या उत्सवात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

भारतीय वायुसेनेसह लष्कराच्या हेलिकॅाप्टरची मदत

या निवडणुकीसाठी भारतीय वायुसेनेचे तीन एमआय-17 व दोन एएलएच, तसेच भारतीय लष्कराचे दोन एएलएच असे एकुण 7 हेलीकॉप्टर व गडचिरोली पोलिस दलाच्या 2 हेलिकॉप्टरसह एकुण 9 हेलिकॉप्टरच्या मदतीने अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान पथकांना रवाना करण्यात आले, तसेच परतही आणण्यात आले. तसेच जिल्ह्रातील सर्व मतदान केंद्रांवर आकाशमार्गाने सुक्ष्म पाहणी करण्यासाठी अत्याधुनिक 130 ड्रोनसह ड्रोन टीम, तसेच माओवाद्यांच्या ड्रोनवर प्रतिहल्ला करण्यासाठी 5 अँटी ड्रोन गन देखिल सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

158 आत्मसमर्पित नक्षलींनीही केले मतदान

दिनांक 13 ते 15 एप्रिल 2024 असे तीन दिवस आरमोरी, अहेरी व गडचिरोली या ठिकाणी गडचिरोली पोलिसांमार्फत 615 टपाली मतदान करण्यात आले. एकेकाळी माओवादी असलेल्या व लोकशाहीला न मानणाऱ्या 158 आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांनी या लोकसभा निवडणुकीत भरघोस मतदानाची नोंद केली आहे.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी मतदानासाठी निर्भयपणे पुढे आलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे अभिनंदन केले. लोकसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेणारे अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक अहेरी एम.रमेश, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोस्टेचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व अंमलदार, सी-60 चे जवान तसेच विविध ठिकाणाहून आलेल्या सर्व पोलिस अधिकारी/अंमलदारांचे त्यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version