Home विदर्भ शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या- जि.प.सभापती संजय टेंभरे

शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या- जि.प.सभापती संजय टेंभरे

0

* अवकाळी पावसाचा तडाखा; उन्हाळी धानशेतीचे नुकसान
गोंदिया – जिल्ह्यात ७ मे रोजी तसेच आज ९ मे रोजी सकाळच्या दरम्यान आलेल्या अवकाळी पावसामुळे कापून ठेवलेले उन्हाळी धान पीक पाण्याखाली आलेले आहे. तसेच उभे असलेले धान भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे शासनस्तरावर तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, अशी मागणी भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी केली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी धानाची लागवड केली होती. बऱ्याच शेतकऱ्यांचे धानपिक परिपक्व झाले असून कापणी व मळणीला सुरुवात झाली आहे. उन्हाचा तडाखा व मजुरांची कमतरता यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी हार्वेस्टर मशीनच्या साहाय्याने मळणी केली. परंतु एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे धानपिक भुईसपाट झाले होते. त्यामुळे त्यांनी मजुरांच्या साहाय्याने धानपिकाची कापणी केली. परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कापलेले धानपिक पाण्याखाली आलेले आहे. तर उभे असलेले धान वादळी वाऱ्याने भुईसपाट झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असून उत्पादनात घट होणार, हे निश्चित. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्याने बळीराजाचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शासनस्तरावरून तत्काळ नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजप किसान आघाडी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी केली आहे.

Exit mobile version