आंबा लागवडीपासून ते काढणीपर्यंत ‘कशी’ घ्यावी काळजी……आंबा कार्यशाळेत मार्गदर्शन

0
14

गोंदिया,दि.२०ः फळबाग असो की कोणत्याही हंगामातील पिके, त्याची लागवडीपासूनच योग्य काळजी घेतली तर वनस्पतीची वाढ आणि त्याच बरोबर उत्पादनात देखील वाढ होणार आहे. विशेष: आंबा फळबागांची लागवड करताना महत्वाचे असते ते क्षेत्र.आंब्याच्या एकदा लागवड झाली की, ते अनेक वर्ष उत्पादन देणारे फळपिक आहे.त्यामुळे आंबा लागवडीपासून ते काढणीपर्यंत काळजी कशी घ्यायची यावर सखोल मार्गदर्शन महादेश फार्मचे अध्यक्ष सचिन नलवडे यांनी केले.ते तालुक्यातील मजीतपूर येथे रुची गृप आॅफ कंपनीच्या ओम एग्रो फार्मच्यावतीने आयोजित एकदिवशीय आंबा कार्यशाळेत(दि.१९)रविवारला बोलत होते.

कार्यक्रमाला मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली शास्त्रज्ञ निवड समितीचे माजी अध्यक्ष सी.डी.मायी,महादेश फार्म पुणेचे अध्यक्ष सचिन नलवडे,रेशीम बोर्डाचे माजी उपसंचालक लक्ष्मीकांत कलंत्री,अकोला कृषी विद्यापीठाचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डाॅ.सुभाष पोटदुखे,गडचिरोली येथील कषी अधिकारी, रुची गृपचे मार्गदर्शक अध्यक्ष डाॅ.एस.एम.ठाकूर,ओम एग्रो फार्मचे भालचंद्र ठाकूर,महेंद्र ठाकूर आदी मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना नलवडे म्हणाले की, ज्या  शेतकऱ्यांना नव्याने फळबाग लागवड करायची आहे.त्या शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या पहिल्या पावसापासून तयारी करणे गरजेचे आहे. आंबा हे असे फळपिक आहे जे कोणत्याही मातीच्या प्रकरात घेता येते.काळाच्या ओघात आता उत्पादनाकरिता अधिकचा काळ वाट पाहण्याची गरज नाही. याकरिता गरजेचे आहे ते सुधारित वाण.सोबतच कधीकधी फळं झाडावरून अकाली पडू लागतात. हे टाळण्यासाठी युरियाचा 2 टक्के द्रावण करून झाडांवर फवारणी करता येते. याकरिता नॅफिलीनदेखील वापरू शकता. प्रथम फळधारणा झाल्यावर जी फवारणी केली जाते त्याच औषधांचा हा फळांवर आणि आंब्याच्या झाडावरही होणार आहे.त्याकरीता पाचप्रकारच्या औषधांची खरेदी एकत्रित करुन अमावस्या व पौर्णिमेच्या दिवशी फवारणी करण्याचा सल्ला दिला.तसेच आंबा पुर्ण परिपक्व होण्याच्या किमान ४५ दिवसापुर्वीच औषधांची फवारणी थांबविण्याबद्दल मार्गदर्शन केले.यासोबतच आंब्याची काढणी करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आंब्याची पिकलेली फळे ३ ते ६ मीटर लांब देठांनी काढणी करावीत. यामुळे फळांवर स्टेम रॉड आजाराचा धोका टाळता येतो असे सांगितले.
यावेळी डाॅ.सी.डी.मायी यांनी आंबा उत्पादक शेतकरी बांधवानी एकत्र येत समुहगट तयार करुन उत्पादक क्षमता वाढवून स्वतःच निर्यात करण्याकरीता सक्षम होण्याकरीता एकत्रित येणे गरजेचे असल्याचे सांगितले.सर्वांनी एकच पिकाची निवड केल्यास बाजारपेठेत उत्पादित माल विकण्यास चांगली संधी मिळते असेही त्यांनी सांगितले.यावेळी लक्ष्मीकांत कलंत्री यांनी रुची गृपसह ओम एग्रो फार्मच्यावतीने आयोजित आंबा कार्यशाळेचे कौतुक करीत ठाकुर कुटुबियांचे अभिनंदन केले.या आंबा कार्यशाळेला गोंदिया तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.