34.5 C
Gondiā
Wednesday, June 3, 2026
Home विदर्भ अकोला जिल्ह्यात वज्राघाताने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

अकोला जिल्ह्यात वज्राघाताने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

0
27

अकोला : जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यामध्ये वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.गेल्या दोन-तीन दिवसापासून उन्ह व सावलीचा खेळ सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तासापर्यंत पावसाचा जोर कायम होता. सर्वत्र पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळपासून पुन्हा उन्हाचा पारा चढला होता. दिवसभर उन्ह चांगलेच तापल्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशीरापर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर कायम होता.दरम्यान, जिल्ह्यामध्ये वीज पडून दोन जणांचे मृत्यू झाले आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील मौजे खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे (२६) हे शेतात मृत अवस्थेत आढळून आले. वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसऱ्या घटनेत मूर्तिजापूर तालुक्यातील टीपराळा येथील शालिग्राम श्रीराम डोंगरे (६५) हे त्यांच्या शेतात झाडाखाली थांबले असताना सायंकाळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याबाबत ब्रह्मी खुर्द येथील तलाठी यांनी अहवाल दिला आहे. प्रशासनाकडून दोन्ही घटनांचा पंचनामा करण्यात आला.