गोंदिया,दि.2७ : सन 2003 या वर्षापासून दरवर्षी, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय व जिल्हा परिषद, गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरावरील सामाजिक न्याय दिनाचा कार्यक्रम दिनांक 26 जून 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथील सांस्कृतिक सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ नागरीक सेवा संघाचे संयोजक दुलीचंद बुद्धे, से.नि. गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमाईवार, ज्येष्ठ नागरीक सेवा संघाचे लखनसिंह कटरे, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. दिशा गेडाम, डॉ.सविता बेदरकर, व्यसनमुक्ती अभियानाचे सदस्य शुद्धोधन शहारे, बाहेकार व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक डॉ. ईशा तेजवाणी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली.
यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत गौरोदगार काढले व छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. उपस्थित प्रमुख अतिथी व वक्त्यांनी याप्रसंगी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला तसेच शासनामार्फत मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे समाजातील घटकांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या आरक्षण धोरणाबाबत माहिती दिली. पुरस्कार प्राप्त विद्यार्थी तसेच शासकीय योजनांचा लाभ घेणारे मागासवर्गीय व्यक्ती यांनी स्वत: बरोबरच आपल्या समाजातील तसेच गावांतील गरजू व्यक्तींसाठी सुद्धा लाभ मिळणेबाबत प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलां–मुलींच्या शासकीय निवासी शाळांमधून इयत्ता 10 वी च्या वार्षिक परिक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. इयत्ता 12 वीच्या परिक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून विशेष उल्लेखनीय यश मिळवून जिल्ह्यातून प्रथम आलेल्या अश्विन झाडु फुल्लुके या विद्यार्थ्याचा राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार स्वरुपात 50 हजार रुपयांचा धनादेश, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कन्यादान योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यात भाग घेऊन विवाह केलेल्या मुलींच्या पालकांना 20 हजार रुपयांचा धनादेश व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची जाणीव–जागृती व्हावी म्हणून यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे वेळी गोंदिया जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलां–मुलींचे शासकीय वसतीगृहांचे गृहपाल, शासकीय निवासी शाळांमधील मुख्याध्यापक, अधीक्षक व कर्मचारी, विविध मागासवर्गीय विकास महामंडळांचे अधिकारी–कर्मचारी, कार्यालयातील कर्मचारीवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशिष जांभुळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार निता भलमे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.