७२ वसतिगृहे तत्काळ सुरू करा-भंडारा ओबीसी सेवा संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
73

भंडारा ः इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे ७२ वसतिगृहे सुरू केले जातील, अशी घोषणा सरकारमार्फत करण्यात आली होती. परंतु, या घोषणेचा विसर झाल्याचे लक्षात येत आहे. सरकारने आतातरी विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन ७२ वसतिगृहे तत्काळ सुरू करावी, अशी मागणी आेबीसी अधिकार मंचने केली आहे. याबाबतचे निवेदन भंडारा जिल्हा ओबीसी सेवा संंघाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे यांनी निवेदन शासनाकडे त्वरीत पाठविण्याचे आश्वासन दिले.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेत ओबीसी विभागाद्वारे वसतिगृह सुरू करण्यासंबंधी वेळापत्रक जाहीर करून आदेशसुद्धा देण्यात आले होते. वेळापत्रकानुसार ५ मार्च २०२४ पासून ओबीसी वसतिगृहे सुरू होणार होते. परंतु, तसे झाले नाही. छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीदिनी तरी शासनाने वसतिगृहे सुरू करावीत, अशी मागणी आेबीसी संघटंनी केली होती. परंतु, आतापर्यंत शासनाकडून काहीही हालचाली झाल्या नाहीत. यावरून विद्यमान सरकार ओबीसी विद्यार्थ्यांचे भले इच्छित नाही. ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा या सरकारचा डाव आहे, असाही आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
मागील सत्रात परीक्षांच्या तोंडावर काही अर्ज घेतले गेले. निवड यादी सुद्धा लावण्यात आली. परंतु, वसतिगृहे सुरू न झाल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही. आता २०२४-२५ सत्र सुरू झाले आहे. सामाजिक न्याय विभागाद्वारे वसतिगृहाची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळ आपल्या विभागाद्वारेसुद्धा तत्काळ अर्ज प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन गोपाल सेलोकर अध्यक्ष ओबीसी सेवा संघ यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी सरचिटणीस संजीव बोरकर, उपाध्यक्ष श्रीकृष्ण पडोळे,अरुण जगनाडे,भाऊराव वंजारी,सुभाष खंडाईत,गोपाल देशमुख, सुभाष पाल, दिपक चिमनकर, लता संजीव बोरकर उपस्थित होत्या.