सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन उत्साहात साजरा

0
28
वाशिम ,दि.२७ जून -डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.किरणराव सरनाईक, प्रमुख अतिथी समाज कल्याण सभापती अशोक डोंगरदिवे,मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही. ए. टेकवानी, ,प्रमुख मार्गदर्शक समाजभुषण गोपाळराव आटोटे गुरुजी,अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे पी. एस. खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले.त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना दिलेल्या लाभांची माहिती दिली. श्री वाघमारे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जातीव्यवस्था व अस्पृश्यतेचे समुळ उच्चाटन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती उदाहरणासह दिली. रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देवून लोककल्याणासाठी झटणारा राजा अशी ख्याती त्यांनी निर्माण केली. शेवटच्या श्वासापर्यंत बहुजनांच्या कल्याणासाठी झटत राहण्याचा निर्धारामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. असे त्यांनी सांगितले.
श्री. आटोटे गुरुजी यांनी आधुनिक समाजाची मुहूर्तमेढ कोल्हापूर संस्थानात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे रोवली व राज्यामध्ये समतेचे राज्य स्थापन व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले. श्री.खंदारे यांनी वाढती व्यसनाधिनता व आजचा युवक या विषयावर सखोल मार्गदर्शक केले. त्यामध्ये त्यांनी अंमली पदार्थाची व्याख्या सांगितली तसेच मुलांना आई-वडीलांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवून त्यांना संस्कारशील बनविले पाहिजे असे सांगून तरुणांनी व्यसनाधिनतेपासून दूर राहण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह व अनु. जाती मुला-मुलींची शासकीय निवासी शाळा येथील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवंत पुरस्कार व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.तसेच अनु. जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, सुरकुंडी रोड, वाशिम येथील मुख्याध्यापक श्री. अतुल भगत यांचा मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.
 श्री. टेकवाणी यांनी समाजास संस्कारशील मानसांची गरज असल्याचे सांगून त्यासाठी थोर महापुरुषांचे आदर्श आपण आपल्या डोळ्यांपुढे ठेवले पाहिजे व त्यानुसार आचरण केले पाहिजे असे सांगितले. श्री. किरणराव सरनाईक पाल्यांना शाळेत न पाठविल्यास पालकांना १ रुपयाचा दंठ ठोठावणारा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते. त्याद्वारे त्यांच्या मनात सर्व घटकांतील मुले शिक्षण प्रवाहात आली पाहिजे याबाबतची तळमळ दिसून येते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेले प्रत्येक कार्य हे आजच्या पिढीसाठी तसेच राज्यकर्त्यांसाठी एक मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक न्याय विभागांतर्गत अंमलात येत असलेल्या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वितरण करण्यात आले.समाज कल्याण निरीक्षक एस. एस. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.