शाळा दुरुस्ती व मुलींच्या शौचालयासाठी प्रस्ताव पाठवा-पालकमंत्री डॉ. गावित

0
31
  • जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी होणार

भंडारा, दि. 15: जिल्ह्यातील सर्व शाळातील नादुरुस्त खोल्यांच्या प्रस्ताव देण्यात यावा. तसेच त्या शाळांमधील मुला-मुलींच्या नादुरूस्त शौचालयांची दुरूस्ती तातडीने करण्यात यावी. त्यासाठी शिक्षण विभागाने जिल्हयातील शाळांना भेट देवून पाहणी करावी, याबाबतचा एकत्रित प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाने देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले.

            पालकमंत्री श्री. गावित यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक आज संपन्न झाली .यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार परिणय फुके, आमदार अभिजीत वंजारी, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीच्या कामाचे विस्तृत सादरीकरण नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर यांनी केले.

संरक्षण भिंत नसलेल्या शाळा तसेच मुलींना शौचालय उपलब्ध नसलेल्या शाळांच्या बाबत तातडीने या कामांचे प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाने सादर करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याची बाब सदस्यांनी मांडल्यानंतर या रस्त्यांची दुरूस्तीचा प्रस्तावही तातडीने देण्याबाबत पालकमंत्र्यांनी सुचीत केले.

पर्यटन विभागाने भंडारा व पवनी तसेच नवेगाव, नागझीरा याच्यासह नजीकच्या क्षेत्रातील पर्यटन स्थळे प्राचीन मंदीरे, इतीहासीक ठिकाणे यांच्यासह पर्यटनासाठी एक टुरिझम सर्किट बनवण्याचे निर्देश त्यांनी पर्यटन विभागाला दिले.

जल जीवन मिशनमधील कामांच्या गुणवत्तेबद्दल सदस्यांनी आक्षेप घेतल्यावर जलजीवन मधील कामांची चौकशी करण्याबाबतचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यंत्रणेला दिले. आभार जिल्हा नियोजन अधिकारी शशी कुमार बोरकर यांनी केले.

लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार भंडारा तालुका अंतर्गत नविन उपकेंद्र खोकरला, गोपीवाडा, ठाणा स्थापन करण्याबाबत, भंडारा तालुका अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूर अंतर्गत मौजा पिपरी उपकेंद्र, गोसेखुर्द प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रात येत असल्यामुळे हे उपकेंद्र साहुली येथे स्थलांतरीत करण्याबाबत जिल्हा नियोजन समितीने मान्यता प्रदान केली.

अतिवृष्टीने भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या तालुक्यात नुकसानीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

जिल्हा विकास आराखड्यामधील 2024-25 या वर्षातील प्राप्त निधी व त्यातील खर्चाची सुरू असलेली कार्यवाही यंत्रणेची प्रगती याबाबतीतला आढावा देखील त्यांनी घेतला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.