गोंदिया,दि.२२-बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार, अमानुष हत्या तसेच हिंदू मंदिरावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि तेथील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा या प्रमुख मागणीसाठी आज रविवारला गोंदिया येथे सकल हिंदू समाजाने मोर्चा काढला.सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्च्याचा समारोप येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील प्रशासकीय इमारतीसमोर करण्यात आला.
शहराच्या मुख्य बाजारपरिसरातून निघालेल्या या मोर्च्यात नागरिकांसह विविध राजकीय पक्ष, संघटना, देवस्थान, मंदिर समित्या, संस्था, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, गणेश मंडळे, प्रतिष्ठाने यांचे प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. मोर्चात महिला व युवतींचा सहभाग लक्षणीय होता. तिरंगा, भगवे ध्वज,निळा व पिवळा ध्वज तसेच विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी भगव्या टोप्या, फेटे आणि गळ्यात भगवे मफलर परीधान करून सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात भारत मातेचा जयघोष करीत घोषणा देण्यात आल्या.बांगलादेशामध्ये हिंसक आंदोलनातून सत्तांतर झाले आणि तेथील हिंदू, जैन, बौद्ध अल्पसंख्य समाज विनाकारण भरडला गेला. हिंदू, जैन, बौद्धांवर अमानुष हल्ले, अत्याचार, क्रूर हत्या सुरू आहेत. हे थांबविण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा. नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार (सीएए) बांगलादेशामधून आलेल्या हिंदू, जैन, बौद्धांना भारतीय नागरिकता देण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी आदी मागण्याचे निवेदन तहसिलदारमार्फेत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले.