शौर्य दिन उत्साहात साजरा
वाशिम, दि.01 : देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या सैनिकांमुळे देश सुरक्षित व सक्षमपणे वाटचाल करत आहे. त्याचप्रमाणे आजच्या युवक, प्रत्येक नागरिकाने देखील आपल्या कामाप्रती एकनिष्ठ राहुन आपली, परिवाराची, परीसराची प्रगती साधून सक्षम बनले पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे रविवार, दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युध्द विधवा, विरमाता, विरपिता यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले होते.या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.याचे फलीत म्हणून शौर्य दिन उत्साहात साजरा झाला.
भारतीय सैन्य दलाने दि. २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तान हद्यीत शिरून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची अभिमानास्पद कामगिरी जनतेपर्यंत व्यापक प्रमाणात पोहचविण्यासाठी दरवर्षी शौर्यदिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने माजी सैनिक, शहिद जवानांच्या विरपत्नी, विरमाता, वीरपिता आणि शौर्य पदकधारकांचा सन्मान जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
श्री.घुगे यांनी शहिदांच्या स्मृतीचिन्हास पुष्पहार अर्पण केला व शहिदांना सामुहिक अभिवादन करण्यात आले. यावेळी भारत
पाकिस्तान युध्दात १२ सप्टेंबर १९६५ रोजी शहिद झालेले शिपाई यशवंत सरकटे यांच्या विरपत्नी शांताबाई सरकटे व जम्मु कश्मिरमध्ये आतंकवादयाविरुद्धच्या ऑपरेशन मोहिमेत ११ डिसेंबर १९९४ रोजी आर्टिलरी रेजीमेंटचे शहिद झालेले शिपाई दगडु लहाने यांच्या विरपत्नी श्रीमती पार्वतीबाई लहाने ,श्रीमती वैशाली अमोल गोरे,वीरपत्नी मिराबाई भोगराज नागुलकर यांचा शाल व श्रीफळ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपीक शिवशंकर झाडोकार, कल्याण संघटक संजय यलमर,कॅप्टन संजय देशपांडे व कर्मचारीवृंद,माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, माजी सैनिक कार्यक्रमाला उपस्थित होते.