थॅलेसेमिया रुग्णाला रक्तदान करून मानवी कर्तव्य पार पाडले

0
49

गोंदिया,दि.०५ः येथील  शास्री वार्ड रहिवासी १४ वर्षीय दक्ष कोठेवार हा लहानपणापासून थॅलेसेमिया सारख्या गंभीर आजाराने त्रस्त  असल्याने वेळोवेळी रक्ताची गरज असते. या आजारात रुग्णाला नियमित रक्त चढवणे अनिवार्य असते, अन्यथा जीव धोक्यात येऊ शकतो. सध्या रक्तपेढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे रक्ताची उपलब्धता करणे आव्हानात्मक बनले आहे.
दक्ष कोठेवारचे वडील संतोष कोठेवार यांनी रक्तदाता प्रद्युम्न बजाज आणि रक्तमित्र विनोद चंदवानी (गुड्डू) यांच्याशी संपर्क साधून ओ पॉझिटिव्ह रक्ताची गरज असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच विनोद चंदवानी यांनी क्षणाचाही विलंब न लावता उमेश केशवानी यांना त्यांच्या नियमित रक्तदात्याच्या यादीतून माहिती दिली आणि प्रद्युम्न बजाज यांनी मनदीप भाटिया यांच्याशी संपर्क साधला. दोन्ही रक्तदात्यांनी तातडीने लोकमान्य रक्तपेढी गाठून रक्तदान करून आपले माणुसकीचे कर्तव्य पार पाडले.
या उदात्त कार्याबद्दल मनदीप भाटिया व उमेश केशवानी यांना विनोद चांदवानी (गुड्डू), राकेश मदनकर, नितीन राईकवार, चेतन चौहान, नितीन पांढरे, राखी चौहान, रितू पारधी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कोठेवार परिवाराने मनदीप भाटिया, उमेश केशवानी, विनोद चंदवानी (गुड्डू) यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त केले.