पारदर्शक व मुक्त वातावरणात निवडणूक घेण्यासाठी
जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी प्रजित नायर
• आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी
• सोशल मिडिया व फेक न्यूजवर करडी नजर
• आचारसंहितेचे पालन करा
• 4 विधानसभा मतदारसंघात 11 लाख 21 हजार 460 मतदार
गोंदिया दि.15 : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केली त्या क्षणापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीचा उत्सव असलेली ही निवडणूक पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. बळाचा प्रयोग (मसल पावर), पैशांचा वापर (मनी पावर), चुकीची माहिती (मिस इन्फॉर्मेशन) आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ही निवडणूक यंत्रणेसमोरील महत्वाची आव्हाने असून यावर मात करण्यासाठी आयोगाच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्यात येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी श्री. नायर बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक किरण अंबेकर, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेवून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची घोषणा केली असून आजपासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यासंबंधिची अधिसूचना जारी करण्यात आली असून आदर्श आचारसंहितेची माहिती सुध्दा निवडणूक आयोगाने दिली आहे. सदर अधिसूचनेद्वारे 22 ऑक्टोबर रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करणे, 29 ऑक्टोबर- नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम मुदत, 30 ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्राची छाननी, 4 नोव्हेंबर- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, 20 नोव्हेंबर रोजी मतदान व 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.
सोशल मिडिया, पेड न्यूज व फेक न्यूजवर आयोगाची व जिल्हा प्रशासनाची करडी नजर असणार असून फेक न्यूज पसरविणाऱ्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल कडक कारवाई करेल. नागरिकांनी सोशल मिडियावर व्यक्त होतांना काळजी घ्यावी तसेच चुकीचे मेसेज पोस्ट करु नये किंवा फॉरवर्ड करु नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य अपेक्षीत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
गोंदिया जिल्ह्यात 63-अर्जुनी मोरगाव, 64-तिरोडा, 65-गोंदिया व 66-आमगाव असे एकूण 4 विधानसभा मतदार संघ आहेत. दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत जिल्ह्यात एकूण 11 लाख 21 हजार 460 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 5 लाख 52 हजार 181 असून स्त्री मतदार 5 लाख 69 हजार 269 आहेत व इतर 10 मतदार आहेत. जिल्ह्यात उपलब्ध असलेले EVM-VVPAT (FLC OK) मशिन्सची संख्या- CU-1567, BU-2852, VVPAT-1695 आहेत. एकूण मतदान केंद्रांची संख्या 1284 आहे. या निवडणुकीत जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपक्रम राबवून मतदान जनजागृतीद्वारे प्रयत्न करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागरिकांना निवडणूक विषयी माहिती घेण्याकरीता व निवडणूक विषयी तक्रार बाबत गोंदिया जिल्ह्यामार्फत हेल्पलाईन क्रमांक 1950 (टोल फ्री), दूरध्वनी क्रमांक 07182-236148, मोबाईल क्रमांक 8080453152 कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या आदर्श आचारसंहिता दरम्यान निवडणुकीशी संबंधीत विविध कामे सुरळीत व विहित कालावधीत पार पाडण्याच्या कामाकरीता भारत निवडणूक आयोगाचे सूचनेप्रमाणे जिल्हास्तरावर 16 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे असे ते म्हणाले.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत अवैध रक्कम, दारु, प्रतिबंधीत औषधे, नशिले पदार्थांच्या वाहतुकी संदर्भात होणाऱ्या जप्तीबाबत Election Seisure Management System (ESMS) प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली असून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणुक कालावधीत प्रसारमाध्यमांनी फेक न्यूज पोस्ट करुन विनाकारण अफवा पसरवू नये. पेड न्यूज बाबत आयोगाच्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, अन्यथा प्रशासनातर्फे योग्य ती कार्यवाही करण्यात येणार. मतदान हा एक उत्सव आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
000000