नागरी व जनसुविधा काम वाटपात घोळ,पालकमंत्री आत्रामांनी जि.प.च्या यादीला दाखवली केराची टोपली

0
408

पालकमंत्री आत्राम यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
गोंदिया : जिल्हा वार्षीक सर्वसाधारण योजनेंतर्गत सन २०२३-२४ व २०२४-२५ अंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा तसेच जनसुविधा अंतर्गत झालेल्या पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत कामांना मंजुरी देण्यात आली. त्यातच काही दिवसांपासून हे काम वाटप सुरू झाले आहे. मात्र या कामवाटपात पाकमंत्र्यांनी आपल्या पक्षातील सदस्यांचा कसा लाभ होईल, या दृष्टीकोणातून काम वाटप केल्याचे दिसून आल्याने सत्तारुढ भाजप व इतर सहकारी पक्षाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकंदरीत नागरी जनसुविधा कामवाटपातील घोळ चव्हाट्यावर आला असून हे प्रकरण न्याय प्रविष्ठ होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
जिल्हा वार्षीक सर्वसाधारण योजना सन २०२३-२४ अंतर्गत ग्रामपंचायतीनी जनसुविधासाठी विशेष अनुदान या लेखाशिर्षकांतर्गत निधी मंजुर करण्यात आला. जिल्हा नियोजन समिती सदस्य, सचिव तथा जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन समितीकडून कामे मंजुर करून घेतली. सदर योजनेंतर्गत कामे करण्याच्या अनुषंगाने आर्थिक वर्षाच्या कालावधी विचारात घेवून ९७ कामांना ६७६ लक्षाचा निधी मंजुर करण्यात आला. यामध्ये ग्राम पातळीवरील अनेक जनसुविधा कामांचा समावेश आहे. तर नागरी सुविधा योजनेंतर्गत सन २०२४-२५ साठी आर्थिक वर्षाचा मर्यादित कालावधी विचारात घेवून नियोजन समितीने एकूण १९१ कामांसाठी १६१९ लक्ष रुपयाचा निधी मंजुर केला. तर नागरी सुविधे अंतर्गत २०२३-२४ साठी ९१ कामांना ६८५ लक्ष रुपये निधी मंजुर केला. शिवाय सन २०२४-२५ अंतर्गत जनसुविधा योजनेंतर्गत २१० कामांसाठी १५१७ लक्ष रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला. काही दिवसापुर्वी झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या वतीने या कामांसाठी क्षेत्रनिहाय तसेच जि.प.सदस्यांच्या मागणीनुसार कामांचे नियोजन करण्यात यावे, अशी यादी पाठविण्यात आली होती. मात्र पालकमंत्री आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत डीपीडीसीच्या यादीला डावलत पालकमंत्र्यांनी आपल्या पक्षातील पदाधिकारी व कंत्राटदारांना काम वाटप केल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून हे काम सुरू असून हा प्रकार उजेडात आल्यानंतर भाजपसह इतर पक्षातील जि.प.सदस्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. वर्क ऑर्डर हाती आल्यानंतर आज जिल्हा परिषदेच्या वर्तुळात पालकमंत्र्यांच्या कार्यप्रणालीला घेवून चांगलाच संताप व्यक्त केल्याचेही दिसून आले.
………..
ड़ीपीडीसीच्या बैठकीत नागरी व जनसुविधा योजनेंतर्गत ़कामांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेतील सदस्यांना विश्वासात घेवून कामाची यादी पाठविण्यात आली होती. मात्र ती यादी पालकमंत्र्यांनी डावलल्याने या कामवाटपात भेदभाव झाला असून जिल्हा परिषदेला डावलण्यात आले आहे.
पंकज रहांगडाले, जि.प. अध्यक्ष