अमरावती : राष्ट्रीय महामार्गाच्या रहाटगाव ते बडनेरा या नवीन बायपास मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बळी जाण्याची ही गेल्या पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना आहे.
शहराला लागून जाणाऱ्या रहाटगाव-बडनेरा नव्या बायपासवर वडाळी ते महादेव खोरी दरम्यान गुणवंत बाबा मंदिरानजीक रस्त्याच्या कडेला बिबट्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी नागरिकांना आढळून आला. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. या बिबट्याचे वय अंदाजे २ वर्षे असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. नवीन बायपास मार्गाच्या लगत वडाळीचे जंगल आहे.या परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. यापुर्वी या भागात बिबट्यांची पिल्ले आढळून आली होती. रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी दिली.