एकाच नंबर प्लेटच्या दोन स्कूल व्हॅन; त्यातही घरगुती सिलेंडर

0
290

भंडारा : शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून आणि आरटीओ विभागाच्या डोळ्यांदेखत खाजगी स्कूल व्हॅन धुमाकूळ घालत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चाललेला असताना शाळा प्रशासन आणि आरटीओ विभाग मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. शहरातील एक खाजगी शाळेच्या दोन स्कूल व्हॅन एकाच नंबर प्लेटच्या असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले.एकच नंबर असलेल्या दोन स्कूल व्हॅन रस्त्यावर सुसाट जात असताना एका सजग नागरिकाने कॅमेऱ्यामध्ये कैद करून ही बाब लक्षात आणून दिली. आरटीओ विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून या दोन व्हॅन चालकांसोबतच आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी पालक वर्गातून केली जात आहे.
मागील अनेक महिन्यांपासून ह्या दोन्ही खाजगी स्कूल व्हॅन चिमुकल्याना घेऊन रस्त्यावर धावत आहेत. मात्र शहरात दोन गाड्या एकच नंबर प्लेटच्या धावत असताना आरटीओ विभागाला याची साधी कल्पना सुद्धा नव्हती हे त्याहून गंभीर आहे. इतकेच नाही तर या दोन्ही दोन्ही व्हॅन गॅस किटवर चालत असून संस्थाचालक खुलेआमपणे या खाजगी स्कूल व्हॅनमध्ये घरगुती गॅस भरतांना दिसून येत आहे. याची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. हा सगळा प्रकार भंडारा शहरातील एसआरसी कॉन्व्हेंट स्कूल मध्ये खुलेआम सुरू आहे.