एकात्मिक पध्दतीने हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन करा-कृषि विभागाचा सल्ला

0
34

गोंदिया, दि.13 : सद्यस्थितीत हरभऱ्याचे पीक हे काही ठिकाणी वाढीच्या तसेच बहुतांश ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. या दरम्यान घाटेअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून 2 ते 3 दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरित द्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरके होऊन वाळतात व गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांदयाच शिल्लक राहतात. पुढे पीक फुलोऱ्यावर आल्यावर हया अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करुन आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणत: 30 ते 40 टक्के घाट्यांचे नुकसान करते.

         एकात्मिक व्यवस्थापन :- घाटे अळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकामध्ये फिरुन घाटे अळ्या वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी ‍किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकाचा जास्त वापर टाळावा. ज्या शेतामध्ये मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल त्या शेतामध्ये बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रती हेक्टर 20 पक्षी थांबे) तयार करुन शेतामध्ये लावावे, त्यामुळे पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होते. कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी घाटे अळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्यूर) एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत. सापळ्यामध्ये सतत तीन दिवस आठ ते दहा पतंग आढळल्यास किड व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.

          शेतकरी बंधूंनी आपल्या पिकाचे निरीक्षण करुन किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर (1 ते 2 अळ्या प्रती मिटर ओळ) आढळून आल्यास किंवा 40 ते 50 टक्के पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी पुढीलप्रमाणे दोन फवारण्या 10 लिटर पाण्यात मिसळून कराव्या. पहिली फवारणी– (50 टक्के फुलोऱ्यावर असतांना) निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एचएएनपीव्ही (1 बाय 10 पीओबी/मिली) 500 एल.ई./हे. किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी. 20 मिली. दुसरी फवारणी– ईमामेक्टीन बेझोएट 5 टक्के एस.जी. 3 ग्रॅम किंवा ईथिऑन 50 टक्के ई.सी. 25 मिली किंवा फ्ल्युबेंडामाईड 20 टक्के डब्ल्युजी 5 ग्रॅम किंवा क्लोरॅनटॅनिलिप्रोल 18.5 टक्के एस.सी. 2.5 मिली. अशाप्रकारे फवारणी करावी. असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, गोंदिया यांनी कळविले आहे.