
गडचिरोली,दि.१३ : समस्त सक्षमीकरण बहुउद्देशिय विकास संस्थेच्या वतीने स्थानिक नवेगांव कार्यालयात दि. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांच्या 424व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला संस्थेच्या अध्यक्षा अॅड. भावना लाकडे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. विद्या कांबळे, सहा. अभियंता तेजस्वीनी सांगोळे, वैशालीताई गेडाम, माधुरी आवळे, शामला गोडमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आपल्या मार्गदर्शनात डॉ. कांबळे म्हणाल्या की, आजही समाजाला सावित्रीबाईची व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांची नितांत गरज आहे. स्त्रीयांमध्ये शिक्षण व धाडस दाखवणा-या महिला फक्त या नायीकांच्या विचारांनी घडू शकतात अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
संस्थेच्या वतीने यावर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्तीक जयंतीचा उपक्रम राबविण्यात आला त्या अनुषंगाने दि. 03 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रम राबवून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. यामध्ये 6 जानेवारी रोजी जि.प. उच्च प्राथमिक शाळा, बोदली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुल शाळा, गडचिरोली येथे विद्यार्थ्यांकरिता सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला.
सदर उपक्रमाची सांगता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी म्हणजेच दि. 12 जानेवारीला करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले व सदर स्पर्धेमध्ये विजेते, उपविजत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तसेच स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. विशेषतः बालकांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचे काव्यस्वरूपात असलेले साहित्य उपस्थितांना वाचन करून दाखविले.
सदर कार्यक्रमात सुत्र संचालन श्रेयश सयाम यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेच्या अध्यक्षा अॅड. भावना लाकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समुपदेशक चित्रलेखा वाकुडे तसेच स्वयंसेवक कार्यकर्ते डिंपल चुनाकर, सोनी खोब्रागडे, प्रविना लाडवे, प्रेरणा उराडे, अदिभ देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास स्थानिक महिला, अभ्यासवर्गाचे विद्यार्थी त्यांचे पालकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.