भारतीय सैनिकांचे गाव म्हणून ख्याती : थलसेना दिवसानिमित्त विविध कार्यक्रम
गोंदिया-सैनिकांचे गाव म्हणून पंचक्रोशीत नावाजलेल्या आमगाव तालुक्यातील कातुर्ली या गावाने आतापर्यंत भारतीय सैन्याला ३५ सैनिक दिले. त्यात आता पुन्हा चौघांची भर पडल्याने ती संख्या आता ३९ वर पोहोचली. या सैनिकांनी गावाला काही देणं लागते या हेतूने विविध उपक्रम राबविणे सुरू केले. १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या भारतीय थलसेना दिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले.
कातुर्ली या गावातील भारतीय सैन्यात असलेल्या सैनिकांनी एकत्र येत कातुर्ली वॉरीयर्स नावाच्या समितीची स्थापना केली. त्यांनी गावाला आपले काही देणे लागते या हेतूने दोन वर्षांपूर्वी गावात भव्य असे प्रवेशद्वार तयार केले. स्वखर्चातून तयार केलेल्या या प्रवेशद्वाराला कातुर्ली वॉरीयर्स प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले. गावातील तरूण,मुले पुन्हा सैन्यात जावे, यासाठी सातत्याने त्यांना नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे. तर परीक्षेची संपूर्ण तयारी देखील करवून घेण्यात येते. यापूर्वी सैन्यात ३४ गावाने दिले. चालू वर्षात पुन्हा चौघांची भर पडून आता ती संख्या ३९ इतकी झाली आहे. भारतीय थलसेना दिवसानिमित्त १५ जानेवारी रोजी कातुर्ली वॉरीयर्स समितीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्याचप्रकारे नव्यानेच सैन्यात दाखल झालेल्यांची नावे प्रवेशद्वारावर कोरण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एस. टी. भालेकर, के.पी. शहारे, श्री पारधी, स्वाती ठाकूर, संतोष भेलावे, धनराज बावनथडे, देवेंद्र नागपुरे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी नव्याने सैन्यदलात दाखल झालेल्या सैनिकांचे पालक धनलाल वैरागडे, सूरजलाल भेलावे, चंद्रकांत कोरे, रतनसिंह बरेले या पालकांचा सत्कार समितीच्या वतीने करण्यात आला. समितीचे अध्यक्ष प्रेमलाल पटले, सदस्य मोसमी कटरे, जैपाल चावके, गणेश बिसेन, निळकंठ कुंभलकर, लोकचंद कुंभलकर, दिपेश चावके, सुनिल भेलावे यांनी विशेष सहकार्य केले. संचालन, प्रास्ताविक व आभार गणेश बिसेन यांनी केले.
गावात सुरू झाले वाचनालय
कातुर्ली वॉरियर्सच्या वतीने गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी वाचनालय आणि अभ्यासिका देखील तयार करण्यात आली. ग्राम पंचायतीच्या जुन्या इमारतीची डागडुजी करून त्यात पुस्तकांसह इतर साहित्य देखील पुरविण्यात आले. या वाचनालयाचा शुभारंभ देखील १५ जानेवारी रोजी करण्यात आला.