बांधावर जाऊन पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली पिकांच्या नुकसानीची पाहणी

0
30

गोंदिया : जिल्ह्यात २७ व २८ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे नुकसान झाले. धान, मका व भाजीपाला उत्पादकांचा तोंडचा घास अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेने त्वरित करावे. तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार यासाठी नुकसानीचे अचूक पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले.
पालकमंत्री बाबासाहेब पाटील हे बुधवार आणि गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याचा दौरा करून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाची लागवड केली जाते. यात धान, मका, भाजीपाला व फळबागांचा समावेश आहे. अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यात मका व फळपिकांचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. परंतु २७ व २८ एप्रिल रोजी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती खा. प्रफुल्ल पटेल यांना देऊन त्वरित पंचनामे करण्यासाठी माजी आ. राजेंद्र जैन यांनी मागणी केली होती. त्याचीच दखल घेत पालकमंत्री बाबासाहेब पाटील हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी डव्वा व  खजरी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर पंचनामे करण्याचे निर्देश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आ. राजकुमार बडोले, माजी आ. राजेंद्र जैन,विनाश काशिवार, केतन वडगाये, निशा काशीवार, कविता रंगारी, सुधा रहांगडाले, डॉ. पटले, रजनी गिन्हेपुंजे, पुष्पमाला बडोले, रुपविलास कुरसुंगे, रमेश बडोले, अनिल बिलिया, राकेश जैन, भय्यालाल पुस्तोडे, डी. यू. रहांगडाले, अस्थिक परशुरामकर, मधुकर गावराने, दिनेश कोरे, भृंगराज परशुरामकर, मोंटू चव्हाण, मनोज गायकवाड, किशोर डोंगरवार, राजेश कापगते व शेतकरी उपस्थित होते