गोंदिया- 100 दिवसीय कार्यालयीन सुधारणा मोहीम राबविण्यात आली. त्यात भारतीय गुणवत्ता परिषद मार्फत या मोहिमेचे मूल्यांकन करण्यात आले. वेबसाईट कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले आहे. त्यात गोंदिया पोलिस अधीक्षक कार्यालयाने 100 पैकी 56.49 गुण मिळवत चौथा येण्याचा मान पटकाविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन जाहीर करण्यात आले. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत गोंदिया पोलिस अधीक्षक कार्यालयाने 100 पैकी 56.49 गुण मिळवत चौथा क्रमांक फटकाविला आहे. शासकीय कार्यालयांतील गुणवत्ता वाढविण्याच्या उद्देशाने ही मोहीम पुढे देखील सुरूच असणार आहे. त्यामुळे आता महसूल विभाग देखील पुरस्कारासाठी धडपड करताना दिसून येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले कौतुक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की या परिवर्तनशील व सर्वकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप शुभेच्छा देतो. गुणवत्ता मोहीम एक सुरुवात आहे. भविष्यातील महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी ही एक आदर्श कार्यपद्धती ठरेल. नागरिकांना जीवन सुखकर करण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे चळवळीत रुपांतर होऊन नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.